पावसाचा जोर पाहून कोकणात लावणी कामास प्रारंभ

संदेश सप्रे
सोमवार, 25 जून 2018

संगमेश्वर - सलग दोन दिवस तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असुन अद्याप कुठेही पुरस्थिती उद्भवलेली नाही. पावसाचा जोर पाहून तालुक्यात लावणीला प्रारंभ झाला आहे. 

संगमेश्वर - सलग दोन दिवस तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर पाहून तालुक्यात लावणीला प्रारंभ झाला आहे. 

शनिवारी रात्रीपासून संगमेश्वर तालुक्यात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. रविवारी दिवसभर थोडी उसंत घेत पावसाचा जोर चालु होता. काल रात्रीही पावसाने आपला वेग कायम ठेवला तर आज सकाळपासून संपूर्ण तालुक्यात मुसळधार सुरुच आहे. गेल्या २४ तासात तालुक्यात पावसाने शंभरी गाठली आहे. मुसळधार पावसाने बाजारपेठा ओस पडल्या असून देवरुखसह संगमेश्वर बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळाला.

गेल्या दोन दिवसाच्या पावसाने सर्वत्र शेती पाण्याने भरून गेली असून हाच मुहूर्त साधत बळिराजाने कालपासुन लावणीला सुरुवात केली. आजही सकाळपासून सर्वत्र लावणीकामांना वेग आला आहे. यावर्षी पेरणी पासून आत्तापर्यंत पावसाने उत्तम साथ दिल्याने शेतकरी आनंदीत असुन लावणी कामे वेळेत सुरु झाल्याने बळिराजाचे संपूर्ण कुटुंबच या कामात गुंतल्याचे दिसत आहे.

मुसळधार पावसाने नैसर्गिक जलस्त्रोत जोमात वाहु लागले असून नद्याही तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. पावसाने अजुन एक दिवस जरी असा जोर कायम ठेवला तर फुणगुस, माखजन, संगमेश्वरला पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाने कुठेही वित्तहानी झालेली नाही. 

Web Title: Ratnagiri News paddy cultivation starts in Konkan

टॅग्स