कार्यकर्ता अंगावर धावून आल्याने लांज्यात महिला कर्मचारी बेशुद्ध

रवींद्र साळवी
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

लांजा - वर्कऑर्डर निघण्यापूर्वीच काम पूर्ण करून त्या कामाचे देय्य मिळवण्यासाठी महिला कर्मचाऱ्यावर दबाव आणला गेला. यासाठी एका राजकीय पक्षाचा हा वजनदार कार्यकर्ता तिच्या अंगावर धावून गेला. हा प्रकार पंचायत समितीतच घडला आहे. या प्रकाराने घाबरून संबंधित महिला कर्मचारी पंचायत समितीमध्येच बेशुद्ध पडली. 

लांजा - वर्कऑर्डर निघण्यापूर्वीच काम पूर्ण करून त्या कामाचे देय्य मिळवण्यासाठी महिला कर्मचाऱ्यावर दबाव आणला गेला. यासाठी एका राजकीय पक्षाचा हा वजनदार कार्यकर्ता तिच्या अंगावर धावून गेला. हा प्रकार पंचायत समितीतच घडला आहे. या प्रकाराने घाबरून संबंधित महिला कर्मचारी पंचायत समितीमध्येच बेशुद्ध पडली. 

त्या कार्यकर्त्यावर अंकुश ठेवण्यास भगवी फौज कमी पडत आहे. महिलांचा आदर करा, अशी शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. मात्र त्यांचे शिलेदार म्हणवणाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांना अशी वागणूक मिळत असल्याने लांजा पंचायत समितीतील कर्मचारी दहशतीखाली आहेत.  

या प्रकारानंतर संतप्त झालेल्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी निषेध करण्यासाठी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने कर्मचारी शांत झाले. या संपूर्ण प्रकाराबाबत सोशल मीडियातून टीकेची झोड उठविली जात आहे. 

या कार्यकर्त्याने एका गावामध्ये पाखाडीचे काम पूर्ण केले आहे. हे काम आमदार फंडातून मंजूर झालेले आहे. मंजूर होण्याअगोदरच त्याने हे काम पूर्ण केले. या कामाचे टेंडर तसेच वर्कऑर्डर आधी काढणे अपेक्षित असते. परंतु सत्तेच्या पाठिंब्यावर हे काम पूर्ण करून संबंधित महिला कर्मचाऱ्याकडे कामाच्या रकमेचा धनादेश मिळावा यासाठी त्याने तगादा सुरू केला.

मंगळवारी (ता. ३०) महिला कर्मचाऱ्याला पंचायत समितीमध्ये पाहून त्याने पुन्हा तिच्याकडे कामाचा धनादेश मागितला. त्यावरून शाब्दिक चकमक झाली. त्यावर हा पुढारी मोठमोठयाने ओरडत महिलेच्या अंगावर धावून गेला. या प्रकाराने घाबरून ती जाग्यावरच बेशुध्द पडली. त्यानंतर पंचायत समितीतील अन्य कर्मचाऱ्यांनी तिला लांजा रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, यापुढे अशाप्रकारे कोणाकडूनही गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.

Web Title: Ratnagiri News Panchayat Samitti Lady worker unconscious issue