वाटदमधील उपशिक्षकाला घरी बसवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

रत्नागिरी - प्राथमिक शाळा वाटद-खंडाळा येथील उपशिक्षकाच्या गैरवर्तनाबाबत विद्यार्थी, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षकांच्या तक्रारी आहेत. ते विद्यार्थ्यांना मारहाण करतात. त्यांचे वर्तन लक्षात घेता त्यांना नोकरीतूनच काढून टाकण्यात यावे, असा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.

रत्नागिरी - प्राथमिक शाळा वाटद-खंडाळा येथील उपशिक्षकाच्या गैरवर्तनाबाबत विद्यार्थी, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षकांच्या तक्रारी आहेत. ते विद्यार्थ्यांना मारहाण करतात. त्यांचे वर्तन लक्षात घेता त्यांना नोकरीतूनच काढून टाकण्यात यावे, असा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.

सभापती विभांजली पाटील अध्यक्षस्थानी होत्या. गजानन पाटील यांनी वाटद शाळेतील उपशिक्षक चंद्रसिंह तुलशीराम दाभाडे यांच्याविरुद्धच्या तक्रारींचा पाढा वाचला. तिसरी व चौथीच्या मुला-मुलींना डस्टर, पट्टीने शारीरिक इजा पोहोचेल असे मारतात, मुलांमध्ये भीती निर्माण होईल, असे वर्तन करतात, अशी माहिती विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीने दिल्याचे सांगितले. 

या प्रकाराबाबत सर्व सदस्यांनी शिक्षकाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती हिरवे यांनी शिक्षण विभागाकडे त्यांच्याबाबत तक्रारी आल्याचे सांगितले. शाळा भेटीवेळी वार्षिक, मासिक, घटक आणि इतर उपक्रमांचे नियोजन त्यांनी केलेले नसल्याचे आढळले. नियमित टाचणही उपलब्ध नव्हते. या शैक्षणिक वर्षासाठी टाचणवही सादर केली नाही. शिक्षक हजेरीतही खाडाखोड व फेरफार आढळली.

त्रुटीबाबत शिक्षण विभागाने श्री. दाभाडे यांना विचारणा केली. मात्र, शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांनाही त्यांनी दमदाटी केली. तसेच, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीची तक्रारही केली आहे. त्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जयगड पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी जावे लागल्याचेही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सभागृहात सांगितले.

तक्रारींवर तक्रारी
उपशिक्षक दाभाडे यांची मंडणगडहून संगमेश्‍वरला बदली झाली. संगमेश्‍वरला तक्रारीमुळे त्यांचे निलंबन केले होते. त्यानंतर ते रत्नागिरी तालुक्‍यात हजर झाले आहेत. अजूनही त्यांच्याबाबत तक्रारी वाढत असून, ही बाब गंभीर असल्याचे सभागृहात पाटील यांनी मांडले.

Web Title: Ratnagiri News Panchyat Samitti meeting