वैध सर्वेक्षण प्रमाणपत्रांअभावी नौकांवरील प्रवासी वाहतूक बंद

संदेश सप्रे
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

देवरूख - ऐन परीक्षांच्या कालावधीत बोटीवर वैध सर्वेक्षण प्रमाणपत्र नसल्याचे कारण दाखवत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बंदर विभागाने भातगाव-करजुवे खाडीतील नौकेद्वारे होणारी प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. 

देवरूख - ऐन परीक्षांच्या कालावधीत बोटीवर वैध सर्वेक्षण प्रमाणपत्र नसल्याचे कारण दाखवत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बंदर विभागाने भातगाव-करजुवे खाडीतील नौकेद्वारे होणारी प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. 

भातगाव-करजुवे खाडीभागातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना संगमेश्‍वर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी आदी ठिकाणी जाण्यासाठी भातगाव खाडीतून नौकेने प्रवास करणे हा एकमेव पर्याय आहे. स्थानिक पातळीवर उच्चशिक्षणाची कोणतीच सोय उपलब्ध नाही. नोकरदारासह रोजगारासाठी इथल्या ग्रामस्थांना खाडी ओलांडणे क्रमप्राप्त ठरते. आजारी व्यक्‍तींनाही डेरवण अथवा रत्नागिरीत जायचे असेल तर हाच पर्याय आहे. 

दृष्टिक्षेप

  • भातगाव-करजुवे खाडीतून होतो प्रवास

  • 60 विद्यार्थ्यांचा प्रश्‍न

  • दहावी, बारावी परीक्षेतच अडचणी

  • नोकरदार, रुग्णांनाही नौकेचाच आधार

  • कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वेळ हवा

सध्या भातगाव, कोसबी आदी ठिकाणाहून दहावी, बारावीसह इतर इयत्तेत शिकणारे 60 विद्यार्थी करजुवे, माखजन, सावर्डे असा प्रवास करतात. त्यांना एकमेव होडीचाच आधार आहे. हाच प्रवास बंद झाल्यास या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. याच महिन्यात बारावी, दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. याच काळात होडीसेवा बंद झाल्यास विद्यार्थ्यांनी परीक्षेला जायचे तरी कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

याबाबत नौकाचालक प्रकाश सीताराम महाकाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्यांनी बंदर विभागाच्या अटींची पूर्तता सुरू आहे. नौका सर्वेक्षण वैध प्रमाणपत्रासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी मिळणे आवश्‍यक आहे. येथील नौकाचालक निरक्षर आहेत. त्यांची आर्थिक स्थितीही हलाखीची आहे. मात्र बंदर विभागाच्या आदेशामुळे ही सेवा बंद होत असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. 

वैध प्रमाणपत्र नसल्याचे नौकाचालकांना पत्र

भातगाव येथील प्रकाश सीताराम महाकाळ यांची "रुक्‍मिणी प्रसाद' या प्रवासी वाहतूक बोटीची 16 जानेवारीला तपासणी केली असता नौकेवर वैध सर्वेक्षण प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. जोपर्यंत नौकेचे सर्वेक्षण होऊन वैध सर्वेक्षण प्रमाणपत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत ही सेवा बंद करण्यात येत असल्याचे पत्र येथील नौकाचालकांना बंदर निरीक्षक, जयगड बंदर, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याकडून प्राप्त झाले आहे.

परीक्षा कालावधीचा विचार करून बंदर विभागाने निदान या कालावधीपुरती तरी ही सेवा सुरू ठेवावी. विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून हा निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांप्रमाणेच येथे रुग्णांनाही पर्याय नाही. यामुळे आमच्या मागणीचा विचार व्हावा.
- नंदकुमार कदम,
माजी सरपंच, भातगाव

Web Title: Ratnagiri News Passenger traffic restrictions on boats due to valid survey certificates