पाटील स्वामीविरोधात विनयभंगाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

रत्नागिरी -  तालुक्‍यातील झरेवाडी येथील तथाकथित पाटील स्वामींच्या बस्तानाला धक्का बसला आहे. या स्वामीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात एका पीडित महिलेने तक्रार दिली आहे. तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील निवेदन दिले आहे. त्यावरून पाटील स्वामीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रत्नागिरी -  तालुक्‍यातील झरेवाडी येथील तथाकथित पाटील स्वामींच्या बस्तानाला धक्का बसला आहे. या स्वामीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात एका पीडित महिलेने तक्रार दिली आहे. तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील निवेदन दिले आहे. त्यावरून पाटील स्वामीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

स्वामींच्या व्हिडिओ क्‍लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. महिलांशी अश्‍लील भाषेत कथित स्वामी बोलत असलेल्या क्‍लिपने अनेकांचा पारा उसळला. त्यामुळे स्वामीविरुद्ध रान पेटले. स्वामींना याचा अंदाज आल्यावर त्यांनी पलायन केल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागामध्ये स्वामीने आपला डेरा हलविल्याचे समजते. 
अंनिसने यामध्ये पुढाकार घेतला. त्यामुळे स्वामींच्या लीलांना बळी पडलेल्या एका महिलेने तक्रार करण्याचे धाडस दाखवले. पीडित महिलेच्या मुलाला आकडी येण्याचा त्रास होता. तेव्हा काहींनी झरेवाडी येथील पाटील स्वामीबद्दल त्यांना सांगितले. सप्टेंबर २०१६ त्या स्वामीकडे गेल्या होत्या. तिथे व्यथा मांडल्यानंतर स्वामी श्रीकृष्ण अनंत पाटील याने आपल्याला अश्‍लील शिवीगाळ केली. 

याबाबत ट्रस्टी जयवंतराव राणे यांना विचारले. त्यांनीही स्वामी पोलिस खात्यात होते. त्यांना पोलिस खाते आणि राजकीय लोकांचा वरदहस्त आहे, असे सांगून मलाच दमदाटी केली. परंतु तक्रार करण्याचे धाडस झाले नाही. चार दिवसांपासून सुरू असलेल्या बाबाविरुद्धच्या या घडामोडीमुळे मी तक्रार देण्याचे धाडस केले, असे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी स्वामी श्रीकृष्ण पाटील याच्याविरुद्ध महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न करणारे वर्तन केल्याबद्धल गुन्हा दाखल केल्याची माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली. 

झरेवाडीतील पाटील महाराजाची मिजास काही वेगळीच होती. मागे-पुढे असणारे भालदार-चोपदार, सोबत ढोल-ताशांचा गजर, अशक्‍य ते शक्‍य करतील स्वामी असा जयघोष करीत स्वामी आसनावर विराजमान होणार. भक्तगणांच्या समस्या जाणून घेऊन स्वतःला कलयुगातील स्वामी समजून त्यांना सल्ले, तोडगे. सोबत होमासाठी अर्धा लिटर दुधाची पिशवी आणि पुढच्या गुरुवारी वारीला येण्याची हमी घेतली जाई. या स्वामींच्या व्हिडिओ क्‍लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

महिलांना खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करत त्यांची अवहेलना करताना स्वामी या क्‍लिपमध्ये दिसत होता. विशेष म्हणजे या क्‍लिपबाबत स्वामीने इन्कारही केलेला नाही. कालच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रत्नागिरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना निवेदन दिले होते. आज पुन्हा जिल्हा पोलिस अधीक्षकांना मी रत्नागिरीकर ग्रुप, लक्षसिद्धी फाउंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी झरेवाडीतील पाटील स्वामीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. महिला पुढे आल्यावर आता तक्रारीला सुरवात झाली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आवाहन
तालुक्‍यातील झरेवाडी या गावामध्ये पाटील बुवा हा बुवाबाजी करीत असून त्याच्यापासून सावध करून भोंदूबाबावर कारवाई करण्याकरिता पोलिस अधीक्षक कार्यालय येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेतर्फे निवेदन देण्यात आले. या प्रकरणी यापूर्वी स्थानिक माध्यमात बातम्या व सोशल मीडियावर एक व्हिडियो क्‍लिप व्हायरल झाली. या प्रकरणी पीडित व्यक्तींनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे तक्रार देण्याकरिता नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी केले आहे.

Web Title: ratnagiri news patil swami crime case