रत्नागिरीतील पावसकर हॉस्पिटलचा नर्सिंग परवाना रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - पावसकर हॉस्पिटलच्या तपासणीत अनेक त्रुटी होत्या. नर्सिंगसाठीच्या नऊ खाटांचा परवाना असताना आणखी पाच बेकायदेशीर खाटा आढळून आल्या. फायर फायटरची अपुरी सुविधा, वैद्यकीय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण नाही, रुग्णांची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ अशा सर्व बाबी माझ्या अहावालामध्ये नमुद केल्या आहेत.

रत्नागिरी - पावसकर हॉस्पिटलच्या तपासणीत अनेक त्रुटी होत्या. नर्सिंगसाठीच्या नऊ खाटांचा परवाना असताना आणखी पाच बेकायदेशीर खाटा आढळून आल्या. फायर फायटरची अपुरी सुविधा, वैद्यकीय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण नाही, रुग्णांची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ अशा सर्व बाबी माझ्या अहवालामध्ये नमुद केल्या आहेत. माझ्या अधिकाराखाली मुंबई नर्सिंग कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल हॉस्पिटलचा नर्सिंग परवाना पुढील निर्णय होईपर्यंत रद्द केला आहे,’ अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी येथे दिली.

 (व्हिडिआे - अमोल कलये)

हॉस्पिटलमध्ये जबाबदार वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसताना रूग्णाला दाखल करून घेतल्याचा हलगर्जीपणाही दिसून येत आहे. तसा अहवाल एमडीआर आणि कायदेतज्ज्ञांच्या बैठकीत ठेवला जाईल, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी रुग्णालयात झालेल्या सौ. ज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यूबाबत चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी डॉ. पावसकर आणि परिचारिकांचे आज जवाब नोंदविले. 

दरम्यान, डॉ. देवकर म्हणाले, ‘‘पोळेकर यांच्या मृत्यूनंतर मी तत्काळ पावसकर हॉस्पिटलला भेट दिली. सौ. पोळेकर यांना दाखल करण्यापासून ते परकार हॉस्पिटलला हलविण्यापासूनच्या सर्व प्रक्रियेची माहिती घेतली. सौ. पोळेकर यांना दाखल करताना कोणीही जबाबदार डॉक्‍टर नव्हते. नर्सच्या जबाबदारीवर तिला दाखल करण्यात आले. त्यानंतर फोनवरून सूचना देऊन औषधोपचार केले. तिची प्रकृती अधिक खालावल्यानंतरही पुढील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांना बोलावले नाही किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हालविल्याचे चौकशीत दिसत नाही. रुग्णाची उपचारासंदर्भातील कागदपत्रे मागितली तर देण्यास नकार दिला. ती सर्व सरांच्या कपाटात आहे, असे सांगून टाळाटाळ केली. मुंबई नर्सिंग कायद्याचे उल्लंघन केल्याबद्धल तत्काळ हॉस्पिटलचा नर्सिंग परवाना पुढील निर्णय होईपर्यंत रद्द केला. बुधवारी एमडीआरची बैठक होणार आहे. त्या बैठकीत अहवाल सादर करू त्याची प्रत पोलिस आणि आरोग्य संचालकांकडे दिली जाईल. माता मृत्यूच्या समितीपुढेही हा विषय घेतला जाणार आहे.’’ 

आणखी एका मातेचे आक्रंदन
सोशल मीडियावर जेव्हा या संदर्भातील बातम्या व्हायरल झाल्या; तेव्हा अतिशय तिखट आणि संतापजनक प्रतिक्रिया आल्या. काहींनी तर आपल्याबाबत घडलेल्या घटना पोस्ट केल्या. पाटील नामक एका महिलेने अडीच वर्षापूर्वी त्याच्याबाबत घडलेली करूण व्यथा मांडली. सोन्यासारखे बाळ आपल्याला गमावे लागले. रुग्ण दाखल करून घेतात; परंतु त्याची जबाबदारी घेत नाहीत. रुग्णांशी खेळणाऱ्या अशा डॉक्‍टरांचा कायमचा परवाना रद्द करावा, असे परखड मत त्यांनी त्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे.

Web Title: Ratnagiri News Pawaskar hospital's nursing license canceled