‘पेढे-परशुराम’बाबत ३१ जुलैला तोडगा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

चिपळूण - तालुक्‍यातील पेढे-परशुराम येथील शेतकऱ्यांच्या जमीन मालकी हक्क व मोबदल्याबाबत आज आमदार सदानंद चव्हाण यांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे शेतकऱ्यांची व्यथा मांडली. शंभर टक्के मोबदल्यासह जमिनींचा मालकी हक्क शेतकऱ्यांना मिळण्याची मागणी केली.

चिपळूण - तालुक्‍यातील पेढे-परशुराम येथील शेतकऱ्यांच्या जमीन मालकी हक्क व मोबदल्याबाबत आज आमदार सदानंद चव्हाण यांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे शेतकऱ्यांची व्यथा मांडली. शंभर टक्के मोबदल्यासह जमिनींचा मालकी हक्क शेतकऱ्यांना मिळण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कुळांना ९० टक्के, तर देवस्थानला १० टक्के मोबदला देण्याचा प्रस्ताव दिला असून त्यावर कार्यवाही होईल. ३१ जुलैला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन महसूलमंत्री पाटील यांनी दिले.

आमदार चव्हाण यांनी देवस्थान इनाम रद्द करून कुळांना मालकी हक्क व शंभर टक्के मोबदला देण्याची मागणी केली. महसूलमंत्री पाटील म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी कुळांना ९० टक्के व देवस्थानला १० टक्के मोबदला देण्याचा शासनाकडे प्रस्ताव दिला. त्यानुसार कार्यवाही होईल. त्यावर आमदारांनी कुळांना शंभर टक्के मोबदल्यासह मालकी हक्क देण्याची मागणी केली.

१८६४ ची सनद आहे. मूळ सनद शासनाकडे आहे का? मूळ सनदेमध्ये नक्की काय नमूद आहे? १८६४ ची सनद असताना १९७२ मध्ये  ७/१२ उताऱ्यावर देवस्थानचे नाव का लावण्यात आले? देवस्थान क वर्ग पर्यटनस्थळात असल्याने मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. त्यातून विकासकामे होतात. देवस्थान पूजाअर्चा देखभालीसाठी शेतकऱ्यांकडून महसूल घेण्याची आवश्‍यकता भासत नाही. देवस्थान व संघर्ष समिती तोडग्यासाठी अनुकूल असतानाही शासनाकडून विलंब होत आहे, असे सांगताच महसूलमंत्री म्हणाले, हा प्रश्न संपूर्ण राज्यात आहे. याबाबत राज्यव्यापी कायदा करण्याची गरज आहे. कायद्याबाबत मतमतांतरे असल्याने वेळ लागतो आहे. या गावांचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.

Web Title: Ratnagiri News Pedhe Parshuram land issue