कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी फिजिक्‍स, केमिस्ट्री अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

दाभोळ - केंद्र व राज्य शासनाने कृषी अभ्यासक्रमाला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केल्याने कृषी विद्यापीठांतील सर्व अभ्यासक्रमांकरिता यावर्षी सामायिक प्रवेश परीक्षा घेऊन (सीईटी) प्रवेश देण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा पेपर बंधनकारक असेल. त्याच प्रमाणे दुसरा पेपर गणिताचा किंवा जीवशास्त्राचा दिला तरी चालणार आहे.

या दोन्ही पेपरचा मिळून ७० टक्‍क्‍यांचा स्कोअर पकडला जाईल. उर्वरित ३० टक्‍क्‍यांसाठी बारावीत मिळालेले गुण धरले जातील. 
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, अन्नतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, सामाजिक विज्ञान आणि इतर विद्याशाखांचे प्रवेश यामुळे ‘सीईटी’मार्फत होणार आहेत.

यंदापासून बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची पदवी प्रवेशप्रक्रियेची सीईटी ही तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवली जाणार आहे. जमिनीचा सातबारा उतारा असल्यास १२ टक्‍के व कृषीचा व्होकेशनल विषय असल्यास १० टक्‍के गुणही धरले जाणार आहेत व इतर प्रचलित अधिभार मिळणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना आपोआप प्राधान्य मिळणार आहे.

सीईटी परीक्षेद्वारे प्रवेश दिल्याने प्रवेशप्रक्रियेत पारदर्शकता येऊन गुणवत्ता वाढेल, गैरप्रकारांना आळा बसेल, शिष्यवृत्ती मिळेल आणि शैक्षणिक कर्ज काढणे सुलभ होईल, तसेच कृषी विद्यापीठांना मानांकन मिळण्यासाठी उपयुक्‍त होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते, की त्यांनी एमएच-सीईटी/जेईई/ एनईईटी यापैकी कोणतीही एक परीक्षा देणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची सुरवात १८ जानेवारी २०१८ पासून झाली असून, अंतिम तारीख २५ मार्च २०१८ पर्यत आहे.

Web Title: Ratnagiri News Physics, Chemistry compulsory to agriculture CET