भाजपची आणि कोकण विकासाचीही मंदावली गती

मुझफ्फर खान
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

भाजपच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडून कडवे आव्हान दिले जात आहे. दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेची कोंडी सुरू आहे. उत्तर रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीचा, तर दक्षिण रत्नागिरीमध्ये सध्यातरी शिवसेनेचे वर्चस्व सुरू आहे.

चिपळूण - राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. या काळात जिल्ह्याच्या प्रगतीची गती काहीशी खुंटल्यासारखी झाली आहे. विकासकामांच्या मोठमोठय़ा घोषणा झाल्या असल्या, तरी विकासाचा वेग मंदावला आहे. सत्तेतील थोरला भाऊ भाजप हा राजकीय पटलावर पिछाडीवर गेला आहे. भाजपच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडून कडवे आव्हान दिले जात आहे. दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेची कोंडी सुरू आहे. उत्तर रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीचा, तर दक्षिण रत्नागिरीमध्ये सध्यातरी शिवसेनेचे वर्चस्व सुरू आहे.

भाजपने सत्तेचा लाभ उठवत जिल्ह्यात विकासगंगा अधिक प्रवाहित करण्याचा निर्धार केला. विकासाच्या घोषणा करत असताना पक्ष संघटनावाढीचा प्रयत्न केला. इतर पक्षातील नाराज भाजपच्या गळाला लागले. जिल्ह्यातील जनतेने भाजपला फारसे जवळ केलेले नाही. भाजपमध्ये मन रमत नसल्यामुळे चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम बाहेर पडले.

सत्ता आणि मंत्रिपद याचा आधार घेत आणि दबावाचे राजकारण करत विरोधकांना नमवण्याची भाजपला जिल्ह्यात संधी नाही. त्यामुळे या जिल्ह्याकडे भाजपचे दुर्लक्ष झाले. तीन वर्षापूर्वी झालेल्या घोषणा हवेत विरल्यासारखी स्थिती आहे. कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्ग, जलवाहतूक, औद्योगिक प्रकल्पाबाबत झालेल्या घोषणा अद्यापही कागदावर आहेत. रस्ते, तलावातील गाळ काढणे, जलयुक्त शिवार अशी काही छोट्या प्रमाणातील कामे मार्गी लागली आहेत, पण काही अपवाद वगळता या कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍न निर्माण झाले आहे. रेल्वेचे प्रकल्प रखडले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम निधीअभावी अद्याप सुरू झालेले नाही. राजापूर तालुक्‍यातील पेट्रोकेमिकल्स व इतर प्रकल्पाला नागरिकाचां विरोध सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नुकताच रत्नागिरी व राजापूर दौरा झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व खासदार सुप्रिया सुळे यांचा चिपळूण व दापोली मतदारसंघात दौरा झाला. भाजपला जिल्ह्याने साथ दिली नाही म्हणून विकास निधी कमी केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. जिल्ह्याचा विकास निधी कमी होतोय त्याला शिवसेनेचे मंत्री जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केला गेला. शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्याचा आरोपही राष्ट्रवादीकडून सुरू आहे. मोर्चा, आंदोलन अशा विविध माध्यमातून सत्ताधारी भाजपविरोधी जनमत तयार करण्यामध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना 60 कोटींचा निधी वाढविला होता. विद्यमान पालकमंत्र्यांना एक रुपयाची वाढ करता आली नाही. आहे त्यानिधीमध्येही कपात झाली. निधी आणण्यामध्ये पालकमंत्री कमी पडले.

- सुनील तटकरे, माजी पालकमंत्री- रत्नागिरी जिल्हा

Web Title: Ratnagiri News political Newsletter