रोजचा नाट्यप्रयोग हेच माझे नाट्यसंमेलन - प्रशांत दामले

रोजचा नाट्यप्रयोग हेच माझे नाट्यसंमेलन - प्रशांत दामले

रत्नागिरी - रोजचा नाट्यप्रयोग हेच माझे नाट्यसंमेलन आहे. मी रंगमंचावर असतो आणि प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेत असतात. नाटकाबद्दल अनेकांच्या चांगल्या प्रतिक्रिया, पत्र मिळतात. नागपुरातील प्रयोग झाल्यावर सहा फूट उंचीच्या व्यक्तीने दामले हे नाटक तुमच्या लायकीचे नाही, पैसे वसूल झाले की पुढे करू नका, असा सल्ला दिला. त्यामुळे हे एक संमेलन असते, असे सांगत अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यसंमेलनाच्या वादांपासून कोसो दूर असल्याचे सांगितले.

‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाच्या प्रयोगासाठी दामले येथे आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘ १९८६ ते १९९२ या काळात चांगले, वाईट असे सर्व प्रकारचे चित्रपट केले. ‘गेला माधव कुणीकडे’च्या  यशानंतर पूर्णवेळ नाटकाकडे वळलो. मालिका, चित्रपट हे दिग्दर्शक व कॅमेरामनचे माध्यम आहे. पण नाटक हा प्रयोग असल्याने ते अभिनेत्याचे असते. ९ डिसेंबर २०१६ पासून आतापर्यंत ‘साखर’चे २२५ प्रयोग केले. सर्वच क्षेत्रात ‘टार्गेट’मुळे आपण कौटुंबिक जबाबदाऱ्या विसरत चाललो आहोत. आपण काय गमावतो व कमावतो, हाती शून्य राहते. स्वतःला देण्यासाठी वेळ नाही. हा गंभीर विषय आहे. पण या विषयाची शुगर कोटेड कॉमेडी केली आहे. पहिल्या २५-३० प्रयोगांनंतर प्रेक्षकांनी हे नाटक उचलून धरले.’’

दामले म्हणाले की, ‘‘ कोकणात विशेषतः रत्नागिरीत यायला आवडते. कारण इथला प्रेक्षक पुण्यासारखा आहे आणि दर्जेदार खवय्येगिरी करायला मिळते. नाटकांना प्रेक्षक मिळत नाही, असे बोलले जाते. पण ते नाटकाच्या दर्जा व अभिनेत्यांवर अवलंबून आहे. मी प्रथमच ‘साखर.. ’ मध्ये वेगळी भूमिका करतोय. या नाटकात टीम वर्क चांगले जुळून आले आहे. नवीन नाटक तयार आहे व ते नोव्हेंबरमध्ये रंगमंचावर येईल.

पालकांची भूमिका महत्त्वाची
लहानपणी मी आई-वडिलांसोबत नाटके बघायला, गाण्याच्या कार्यक्रमाला जात होतो. हिंदू कॉलनी सहाव्या गल्लीतून शिवाजी मंदिरला जाण्याकरिता २५ मिनिटे लागायची. नाटक संपल्यावर परत येताना मी दोघांमध्ये असायचो आणि आई-वडिलांची चर्चा फक्त नाटकावरच व्हायची. यातूनच नाटकाचे संस्कार झाले. आता नाटकाचे प्रेक्षक वाढवण्यासाठी पालकांनी मुलांना नाटकाला घेऊन यावे, असे दामले यांनी आवाहन केले.

सर्व्हिसपेक्षा नाट्य इंडस्ट्री अव्वल
सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सेवा दिल्यानंतर मोबदला दिला जातो. पण नाट्य इंडस्ट्री त्याहीपेक्षा अव्वल आहे. नाटक दाखवण्यापूर्वी तिकीट रूपाने मोबदला घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक प्रयोगावेळी आमची जबाबदारी वाढलेली असते, असे प्रशांत दामले यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com