रघुवीर घाटामुळे खेड नकाशावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

खेड - तालुक्‍यातील व कोयनेच्या जलाशयामुळे महाबळेश्‍वर तालुक्‍याशी संपर्क तुटलेल्या दहा गावांचा बाह्यजगाशी संपर्क जोडणारा रघुवीर घाट पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. 

खेड - तालुक्‍यातील व कोयनेच्या जलाशयामुळे महाबळेश्‍वर तालुक्‍याशी संपर्क तुटलेल्या दहा गावांचा बाह्यजगाशी संपर्क जोडणारा रघुवीर घाट पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. तालुक्‍याचे महत्त्व पर्यटन नकाशावर अधोरेखित होत आहे. महाबळेश्‍वर माथेरानप्रमाणेच रघुवीर घाटमाथा देखील एक पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर येईल. 
रघुवीर घाटाची निर्मिती १९९०-९१ मध्ये सुरू झाली. २००१ मध्ये हा घाट रस्ता तयार झाला.

कोयना धरण ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी बनली. नंतर त्याच्या जलाशयामुळे सातारा जिल्ह्यातील शिंदी, वळवण, आरव, मोरणी, उचाट, वाघावळे, लामज, निवळी, अकल्पे, गाडीवली आदी गावांचा महाबळेश्‍वर तालुक्‍याशी संपर्क तुटला होता. १९९०-९१ नंतर तब्बल दहा वर्षांनी रघुवीर घाटाच्या निर्मितीने या गावांचा थेट संपर्क रत्नागिरी जिल्ह्यासोबत प्रस्थापित झाला.

रघुवीर घाटामुळे आमची गावे जगाशी जोडली गेली. आम्हाला सर्वच सुविधा मिळवण्यास मदत होते. स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र मतदानानंतर या गावांकडे पाठ फिरवतात. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ आम्हाला मिळत नाहीत. घाटातील सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येतात. 
- सदानंद मोरे,
ग्रामस्थ, शिंदी

रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेल्या महिमानगडाची, सह्याद्रीच्या उंच रांगांमध्ये असलेल्या शैल्य चोकेश्‍वर (चकदेव) व जोम मल्लिकार्जुन या देवस्थानांपर्यंत पोचण्याची बिकट वाट सुकर झाली. समुद्र सपाटीपासून ४२०० फूट उंचीवरील महिमानगडाचा इतिहास अभ्यासण्यासाठी हौशी इतिहासप्रेमींना मार्ग मोकळा झाला. दहा गावांना घाट निर्मितीपूर्वी तापोळा येथून बोटीने महाबळेश्‍वर येथे बाजारहाट व इतर दैनंदिन कामांसाठी जाता येत असे. परंतु सुरक्षित जलवाहतूक उपलब्ध नव्हती. आता रघुवीर घाटाच्या रूपाने या गावांतील ग्रामस्थांना खेड तालुक्‍याशी संपर्क ठेवणे सोपे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News Raghuveer Ghat special