दारूऐवजी मिळाली बेकायदेशीर बंदूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

गुहागर - दारू धंद्यावर धाड टाकायला गेलेल्या पोलिसांनी बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या तरुणांवर कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी वडदमधील दोघांना अटक केली; मात्र बेकायदेशीर दारू धंद्यावरील कारवाईबाबत कोणताही गुन्हा गुहागर पोलिस ठाण्यात दाखल झालेला नाही. 

गुहागर - दारू धंद्यावर धाड टाकायला गेलेल्या पोलिसांनी बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या तरुणांवर कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी वडदमधील दोघांना अटक केली; मात्र बेकायदेशीर दारू धंद्यावरील कारवाईबाबत कोणताही गुन्हा गुहागर पोलिस ठाण्यात दाखल झालेला नाही. 

सहायक पोलिस फौजदार विष्णू श्रीपत कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीप्रमाणे वडद गणपतवाडी येथील रमेश रत्नू कातकर हा गावठी हातभट्टीचा चोरटा दारू व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी पोलिस वडद गावठाणवाडीला गेले. त्यावेळी श्रीकांत रमेश कातकर (वय ३०) हा विनापरवाना शस्त्र वापरत असल्याची माहिती मिळाली.

म्हणून रविवारी (ता. ६) दुपारी ४ वाजता दोन पंचांसमवेत पोलिस रमेश कातकर याच्या घरी गेले. झडतीत श्रीकांतने लाकडाखाली लपवलेली सिंगल बोअरची बंदूक पोलिसांना काढून दिली. पोलिसांनी विनापरवाना बेकायदेशीररीत्या बनवलेली बंदूक बाळगल्याबद्दल श्रीकांतला ताब्यात घेतले. बंदूक त्याने अंकुश लक्ष्मण जोगले (वय ३७, रा. वडद) याच्याकडून घेतल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अंकुशलाही ताब्यात घेतले. रविवारी रात्री गुहागर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. सोमवारी (ता. ७) दोघांना चिपळूण न्यायालयात हजर करण्यात आले. 

दारू धंद्याबाबत गुन्हाच नोंद नाही
पोलिस वडदमध्ये बेकायदेशीर असलेल्या दारू धंद्यावर कारवाईसाठी गेले; मात्र याबाबतच्या कारवाईची कोणतीही नोंद नाही. वडद गावातून मिळालेल्या माहितीप्रमाणे सुरवातीला काही पोलिस केवळ दारू धंद्यावर धाड टाकण्यासाठी आले होते; मात्र त्यानंतर अन्य पोलिसांनी येऊन बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याबद्दल कारवाई केली.

Web Title: Ratnagiri News raid on illegal Gun manufacture