ओएमएसद्वारे कोकण रेल्वे रुळांची तपासणी

राजेश कळंबटे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील रुळांची अत्याधुनिक अशा ऑटिलेशन मेजरिंग मशिन (ओएमएस) सुरक्षा पथकाकडून तपासणी करण्यात आली. रुळावरून रेल्वे गेल्यानंतर डब्यातील मशिनमध्ये त्याचे ग्राफिक तयार होते. रुळामध्ये त्रुटी असतील तर त्या ग्राफिकद्वारे दिसतात. भारतीय रेल्वे मार्गावर वापरण्यात येणारी सात डब्यांची ही रेल्वे रोहा ते मडगाव अशी चालविण्यात आली.

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील रुळांची अत्याधुनिक अशा ऑटिलेशन मेजरिंग मशिन (ओएमएस) सुरक्षा पथकाकडून तपासणी करण्यात आली. रुळावरून रेल्वे गेल्यानंतर डब्यातील मशिनमध्ये त्याचे ग्राफिक तयार होते. रुळामध्ये त्रुटी असतील तर त्या ग्राफिकद्वारे दिसतात. भारतीय रेल्वे मार्गावर वापरण्यात येणारी सात डब्यांची ही रेल्वे रोहा ते मडगाव अशी चालविण्यात आली. त्यामध्ये आढळून आलेल्या त्रुटी पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

या पथकामध्ये भारतीय रेल्वे सुरक्षा आयुक्‍त के. के. जैन, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, संचालक राजेंद्र कुमार, एस. डी. गुजराथी, मुख्य अभियंता एन प्रकाश, यांत्रिकी अभियंता दीपक त्रिपाठी, डी. एस. लिंगुराज, एल. के. वर्मा, विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये आदी उपस्थित होते. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणी नवीन रूळ बसविण्यात आले आहेत.

काही भागात अजूनही जुनेच रूळ आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या सुरक्षा पथकातील सात डब्यांच्या या रेल्वेची रूळ तपासणी महत्त्वाची ठरली आहे. एका डब्यात अत्याधुनिक मशिन बसविण्यात आले होते. त्यावर रुळातील त्रुटी सहजपणे लक्षात येतात. तसेच त्यातून रूळ सुरक्षित ठेवण्याचे उपाय तत्काळ राबवले जाऊ शकतात. मध्य रेल्वेच्या विशेष सुरक्षा पथकाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पाहणी केली जाते. 

अपघातग्रस्तांच्या मदतीची प्रात्यक्षिके
कोकण रेल्वे मार्गावर अपघात झाल्यास किंवा गाडीला आग लागल्यास करावयाच्या उपाययोजना, जखमींना उपचार देणे याची प्रात्यक्षिके कोकण रेल्वेच्या विशेष पथकाने रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखविली. पूल किंवा उंचावरील भागात अपघातग्रस्त रेल्वेचा डबा लोंबकळत राहिल्यास त्यातील जखमी प्रवाशांना सहजपणे बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दाखविले. त्यासाठी उंचावर डब्याची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. शिडीच्या साह्याने जखमींना खाली आणण्यात आले.

Web Title: Ratnagiri News Rail track checking by otilation measuring machine