जगबुडीने ओलांडली धोक्‍याची पातळी

सिद्धेश परशेट्ये
गुरुवार, 5 जुलै 2018

खेड - गेले दोन दिवस तालुकाभरात जोरदार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून संततधार सुरू असून जगबुडी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंगच्या रस्त्यावर पाणी आले असून खेड, सुसेरी, बहिरवली रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.

खेड - गेले दोन दिवस तालुकाभरात जोरदार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून संततधार सुरू असून जगबुडी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंगच्या रस्त्यावर पाणी आले असून खेड, सुसेरी, बहिरवली रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.

तालुक्‍यातील अंतर्गत भागात वाहतूक विस्कळित झाली असून नारंगीच्या पातळीत वाढ झाल्याने शेतीत पाणी घुसले आहे. खेड शहरानजीकचे देवणे बंदर पाण्याखाली गेले आहे.

बुधवारपासून पावसाची संततधार सुरूच आहे. आज दिवसभरात खेड तालुक्‍यात 90.28 मिलीमिटर पावसाची नोंद झाली तर एकूण पाऊस 1030.42 मिलीमिटर झाला आहे. जगबुडीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीवरील कोल्हापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी माती रस्त्यावर आली. रुंदीकरणाच्या कामामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य आहे.

कशेडी घाटातील आंबा स्टॉपनजीक अवघड वळणावर काल (ता. 4) सायंकाळी एक कंटेनर उलटला. यात दोघे जण किरकोळ जखमी झाले. धामणदेवीनजीक अवघड वळणावर एक मालवाहू ट्रक रस्त्यावर उलटला. यात एकजण किरकोळ जखमी झाला. जगबुडीची पातळी सहा मीटर झाली आहे.

जगबुडी व नारंगी नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढते आहे. पावसामुळे कशेडी, भोस्ते, परशुराम या घाटमाथ्यावर पहाटेच्या सुमारास धुक्‍याची दुलई पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना धुके व पावसातून माग काढताना कसरत करावी लागत आहे. तालुक्‍यात शेतीच्या कामांना वेग आला असून ग्रामीण भागात लावणीची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.

कशेडी घाटात काही ठिकाणी दरड खाली येत आहे. रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहने सावकाश हाका. अवघड वळणावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका.
- मधुकर गमरे,
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

 

Web Title: Ratnagiri News rain in Khed taluka Jagbudi River overflow