वरिष्ठ न्यायाधीशांची पत्रकार परिषद ही गंभीर बाब - राज ठाकरे

राजेश कळंबटे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

रत्नागिरी - सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन थेट सरन्यायाधीशांवर बोलावे लागते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. लोकशाहीला धोकादायक आहे. न्याय व्यवस्थेत सरकार किती हस्तक्षेप करते, हे यावरुन लक्षात येते. या प्रकारामुळे देशात अराजकता माजेल, अशी प्रतिक्रिया मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी - सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन थेट सरन्यायाधीशांवर बोलावे लागते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. लोकशाहीला धोकादायक आहे. न्याय व्यवस्थेत सरकार किती हस्तक्षेप करते, हे यावरुन लक्षात येते. या प्रकारामुळे देशात अराजकता माजेल, अशी प्रतिक्रिया मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

नाणार येथील रिफायनीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरीत आलेल्या ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना देशभरातील घडामोडींवर वक्तव्य केले. सुप्रिम कोर्टाबाबत अशी स्थिती असेल तर न्याय कोणाकडे मागायचा. मुख्य न्यायाधीशाच्या विरोधात बोलण्याचे धाडस करणार्‍यांचा काय कोंडमारा झाला असेल हे सांगणे मुश्किल आहे. देशाच्या इतिहासात घडलेली पहिलीच घटना आहे. हे प्रकरण सहज मिटेल असे वाटत नाही, ते पुढे सुरुच राहणार आहे.

न्याय व्यवस्थेवर सरकार नियंत्रण ठेवू लागले आहे. यापुर्वी निवडणुक आयोग हाताबाहेर गेले, ते गुजरात निवडणुकीतून दिसले, असा टोलाही राज यांनी मारला. अरुण शौरी म्हणाले ते बरोबर आहे. अडीच माणसे देश चालवत आहेत. हे सरकार आहे की काय, असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी भाजपलाही लक्ष्य केले.

नाणारच्या लोकांना भेट दिल्यानंतरच रिफायनरीविषयी मी भुमिका मांडेन. रिफायनरी प्रकल्पबाबत मला कडवट व्हावे लागेल. जमीनी देऊ नका हे मी वारंवार स्पष्ट केले होते. तरीही अनेकांनी जमीनी दिल्या. प्रकल्पांना विरोध होतो, नंतर तो मावळतो. त्यामुळे कोकणी माणसाला हाताळणे सरकारला सोपे झाले आहे. याचा विचार कोकणी माणसाने केला पाहीजे. जे अणुऊर्जा प्रकल्पाचे झाले, तेच रिफायनरीचे होउ नये. सरकारला पाहीजे म्हणून प्रकल्पाला पाठींबा देऊ नये. पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की निवडणुका आणि स्थानिक प्रश्‍न वेगळे असे न करता लोकप्रतिनिधीला निवडून देताना त्यांच्याकडून वदवून घेतले पाहिजे. जमीनीचे दर वाढतात म्हणून विकू नयेत.

खासदार राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले, त्यांना काही माहिती नाही असे नाही. पण विरोध करुन स्वतःचा भाव वाढविण्याचे काम ते करत आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाईनाही माहिती नव्हते असे नाही. चालाख लोकांना सगळी माहिती असते. ते जमीनी कमी दरात विकत घेतात आणि चढ्या दराने विकतात. तोटा मात्र सामान्यांना सहन करावा लागतो.

भीमा-कोरेगाव येथे जे झाले ते एकमेकांवर ढकलले जात आहे. यात कोणाचा फायदा झाला सर्वांना माहित आहे. पण महाराष्ट्राचा मोठा तोटा झाला. 2015 मध्ये मी बोललो होतो की निवडणुकीसाठी जातीय दंगली घडविल्या जातील. भीमा-कोरेगावमध्ये ते प्रत्यक्षात पाहायला मिळाले. ही घटना पूर्वनियोजित होती. नजीकच्या काळात हिंदू-मुस्लिम यांच्यात धार्मिक दंगली घडवल्या जातील,” असा राजकीय ठोकताळा  ठाकरे यांनी मांडला.

Web Title: Ratnagiri News Raj Thakare Press conference