राजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चुरस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

राजापूर - राजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांसह राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी आणि उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली आहे.

राजापूर - राजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांसह राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी आणि उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली आहे. पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि विरोधातील शिवसेनेला शह देण्यासाठी समविचारी पक्षांकडून तिसरी आघाडी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले 
आहेत.  

नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदारांमध्ये सत्ताधारी काँग्रेसकडून विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक अभय मेळेकर, ॲड. शशिकांत सुतार, माजी नगरसेवक नरेंद्र कोंबेकर आदींची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून शीतल पटेल यांचे नाव आघाडीवर आहे.

वर्षभरापूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हनिफ काझी यांनी बाजी मारली होती. मात्र जातपडताळणीमध्ये त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूका होणार आहे. ही निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पक्षांसह इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीच्या दृष्टीने विचार करता सत्ताधारी काँग्रेस आघाडीकडून विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे.  शिवसेनेकडूनही जोरदार फिल्डींग लावली जात आहे. सेनेकडून उमेदवार म्हणून मेळेकर यांच्यासह कोंबेकर, ॲड. सुतार आदींची नावे चर्चेत आहेत. मेळेकर आणि कोंबेकर यांनी नगरसेवकपदाच्या कारकिर्दीमध्ये विकासकामे केली आहेत.

तसेच वकील असूनही सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ॲड. सुतार यांची प्रतिमा आहे. त्यामुळे सेनेसमोर निवडीचे आव्हान आहे.  भाजपकडून सौ. पटेल यांना रिंगणात उतरविले जाण्याची शक्‍यता आहे. नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडणुकीत उतरणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Web Title: Ratnagiri News Rajapur Nagarpalika Election