राजापूर नगराध्यक्ष निवडणूकीसाठी विनिंग कॅंडिडेट निवडताना सर्वांचा कस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

राजापूर - राजापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस, शिवसेना, भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान या प्रमुख पक्षांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले आहे. काँग्रेस वगळता अद्याप कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने ‘विनिंग कॅंडिडेट’ निवड करताना पक्ष नेतृत्वाचा कस लागत आहे.

येथील पालिकेच्या रिक्त असलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला पाच दिवस उलटले, तरी काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप आपल्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. काँग्रेसने प्रभारी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे पारंपरिक विरोधक असलेल्या शिवसेना आणि भाजपकडून अद्याप कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

शिवसेनेकडून माजी नगरसेवक अभय मेळेकर, ॲड. शशिकांत सुतार, विद्यमान विरोधी गटनेते विनय गुरव, युवा नगरसेवक सौरभ खडपे, माजी नगरसेवक नरेंद्र कोंबेकर यांची नावे चर्चेत असून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेतृत्वाच्या उमेदवारी निश्‍चिती संबंधात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने बैठका होत आहेत.

भाजपकडून माजी नगरसेविका शीतल पटेल, विद्यमान नगरसेवक आणि पाणीपुरवठा सभापती गोविंद चव्हाण, मोहन घुमे, महेश मणचेकर, प्रदीप मांजरेकर, विजय कुबडे आदींनी उमेदवारी मागितली असून त्याचा अहवाल जिल्हा पातळीवर पाठविण्यात आला आहे. त्या ठिकाणी उमेदवार नावनिश्‍चिती होणार आहे. त्यातच, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह चर्चेत असलेल्या तिसऱ्या आघाडीकडूनही काही नावे चर्चेत आहेत.

इच्छुकांची भाऊगर्दी
सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारी निवडीमध्ये पक्षनेतृत्वाचा कस लागणार आहे. त्यातून निवडणुकीतील प्रत्यक्षातील रणसंग्रामापूर्वीच राजकीय पक्षांची निम्मी ताकद खर्ची पडताना दिसत आहे.

Web Title: Ratnagiri News Rajapur Nagarplika byelection