राजापूरचा निसर्गसौंदर्याचा खजिना संकेतस्थळाद्वारे खुला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

राजापूर - निसर्गसौंदर्याचा वारसा लाभलेल्या राजापूर तालुक्‍याचा पर्यटन खजिना आता वेबसाईटद्वारे जगभरासाठी खुला झाला आहे. पर्यटनदृष्ट्या तालुक्‍याचा विकास करताना त्यातून रोजगारनिर्मिती कशा पद्धतीने करणे शक्‍य आहे, या संबंधित जनजागृतीसह प्रत्यक्ष उपक्रम राबवित असलेल्या माय राजापूर या संस्थेने www.myrajapur.in नावाचे संकेतस्थळ विकसित केले आहे.

या संकेतस्थळात राजापूरमधील पर्यटन केंद्रांसह त्या केंद्रावर जायचे कसे याची माहिती दिली आहे. राजापूरची सांस्कृतिक माहितीही त्यामध्ये आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ पर्यटकांसह अन्य लोकांना दिशादर्शकच ठरणार आहे.  

काय आहे संकेतस्थळावर

  •  राजापूरची धार्मिकस्थळे

  •  ऐतिहासिक स्थळे

  •  प्रेक्षणीय स्थळे

  •  पर्यटकांना खिळवून ठेवणारे समुद्रकिनारे

  •  प्रेक्षणीय धबधबे 

  •  पर्यटनस्थळांसंबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्या

सह्याद्रीच्या पायथ्यापासून किनारपट्टीपर्यंत विस्तारलेल्या राजापूर तालुक्‍यात अनेक पर्यटनस्थळे, अनेक ठिकाणे, धबधबे, समुद्रकिनारे, राजापूरची वखार, हजारो वर्षांपूर्वीची स्थापत्यशास्त्राचा उलगडा करणारी मंदिरे, हजारो वर्षांपूर्वीच्या मानवजातीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पांचा समावेश आहे. स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये राजापूरची सुवर्णाक्षरांनी नोंद आहे. गेल्या काही वर्षामध्ये शोधलेल्या कातळशिल्पांनी यात भर पडली आहे.

राजापूरचा निसर्गाचा खजिना मात्र फारसा पर्यटकांच्या नजरेस पडलेला नाही. या माध्यमातून पर्यटन व्यवसाय विकसित झाल्यास रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. मात्र, त्यादृष्टीने कुणीही फारसे प्रयत्न केलेले नाहीत. हेच हेरून माय राजापूर संस्थेने तालुक्‍यात दुर्लक्षित राहिलेल्या पर्यटन विकासाला चालना देण्याचा निर्धार केला. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्‍यातील पर्यटनस्थळांवर आधारित स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केले. माय राजापूरचे राजीव सप्रे, जगदीश पवार आणि सहकाऱ्यांनी ते विकसित केले.

Web Title: Ratnagiri News Rajapur nature