राजापूर नगराध्यक्ष निवडणूकीत कॉंग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना आमने सामने 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

राजापूर - राजापूर नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत एकत्र लढणारी कॉंगेस आघाडी विरुद्ध स्वतंत्रपणे लढणारे शिवसेना, भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. खरा सामना कॉंग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना असाच होणार आहे. 

राजापूर - राजापूर नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत एकत्र लढणारी कॉंगेस आघाडी विरुद्ध स्वतंत्रपणे लढणारे शिवसेना, भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. खरा सामना कॉंग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना असाच होणार आहे. 

पंधरा जुलैला निवडणूक होत आहे. कॉंग्रेस आघाडीचे जमीर खलिफे, शिवसेनेचे अभय मेळेकर व भाजपचे गोविंद चव्हाण रिंगणात आहेत. जमीर खलिफे हे मागील एक दशक नगरसेवक असून त्यांनी पालिकेत सभापतीपदे देखील भूषविली आहे. उपनगराध्यक्ष असताना नगराध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आला. पाणी प्रश्नासह, रस्ते व अन्य मूलभूत सुविधा यावर विशेष लक्ष दिले होते. त्याचा लेखाजोखा ते मांडत आहेत.

अभय मेळेकर यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम पाहिले. ते पक्षाचे प्रतोद होते. आपल्या प्रभागातील विविध विकासकामे मार्गी लावली. त्याची पोचपावती ते मतदारांकडे मागत आहेत. मागील वेळीही मेळेकर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे.

भाजप उमेदवार गोविंद चव्हाण हे पालिकेतील त्या पक्षाचे एकमेव नगरसेवक आहेत. ते पाणी सभापती आहेत. शहरात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी जातीनिशी खबरदारी घेतली. या कामांच्या जोरावर हे तिन्ही उमेदवार नशीब आजमावत आहेत. 

तिन्ही उमेदवारांचा जोमाने प्रचार सुरू आहे. त्यांचे पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते प्रभागात प्रचारात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे आमदार राजन साळवींसह पदाधिकारी प्रचारात उतरले आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे माजी युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव व दोन्ही पक्षांचे पदाधिकारी किल्ला लढवत आहेत. 

एकसंघ प्रचार होईल का? 
भाजपमध्ये बंडखोरी केलेल्या शीतल पटेल यांच्या माघारीनंतर भाजपच्या तंबूत सुटकेचा श्वास सोडला. भाजपचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत. मात्र उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये जे नाट्य घडले होते, ते पाहता दुभंगलेली मने पुन्हा सांधली जाऊन एकसंघ प्रचार होईल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 

Web Title: Ratnagiri News Rajapur Palika election special