५४ व्या वर्षीही गोमूसोबत लवलवणारा नाखवा

राजेंद्र बाईत
शुक्रवार, 30 मार्च 2018

शिमगोत्सवातील गोमू नाचामध्ये गोमूसोबतची नाखवाची भूमिका गेली दहा वर्षे साकारत आहेत. रांगोळीसारखी कलाही त्यांनी जोपासली आहे. वयाच्या ५४ व्या वर्षीही कला जोपासण्यासाठीची धडपड आणि अमाप उत्साह हीच श्री. अमरे यांची ओळख बनली आहे. 

राजापूर - व्यवसायानिमित्ताने पहाटे ४ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सतत धावपळ, शारीरिक, मानसिक त्रास अशा स्थितीतही येथील पेपरविक्रेते राजेश अमरे यांनी स्वतःमधील कला जिवंत ठेवली आहे. शिमगोत्सवातील गोमू नाचामध्ये गोमूसोबतची नाखवाची भूमिका गेली दहा वर्षे साकारत आहेत. रांगोळीसारखी कलाही त्यांनी जोपासली आहे. वयाच्या ५४ व्या वर्षीही कला जोपासण्यासाठीची धडपड आणि अमाप उत्साह हीच श्री. अमरे यांची ओळख बनली आहे. 

वेळ नसल्याचे कारण देत अंगभूत कला जोपासण्याकडे दुर्लक्ष करणारी अनेक माणसे आसपास वावरताना दिसतात. दिवसभराच्या व्यावसायिक व्यापामध्येही कला जोपासताना अनेक वेळा तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, रसिकांच्या पसंतीला उतरलेला अंगभूत कलाकार जिवंत ठेवण्याची धडपड अमरे करीत आहेत. प्रसिद्ध पेपरविक्रेते मधुकर अमरे यांचे ते चिरंजीव. राजेश यांनी मुंबई येथे वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर गेली ३५ वर्षे शहरामध्ये ‘साईराज एजन्सी’ हा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. वाचकांचा दिवस सकाळी ६ नंतर सुरू होतो. मात्र श्री. अमरे यांचा दिवस पहाटे ४ वाजता सुरू होऊन रात्री उशिरा संपतो. 

शिमगोत्सवामध्ये घरोघरी गोमूचा नाच होतो. या गोमूच्या नाचामध्ये गोमूसोबतच नृत्य करणाऱ्या नाखवाचीही भूमिका आणि नृत्य महत्त्वपूर्ण असते. लक्षवेधी रंगभूषेतील नाखवा गेल्या दशकभरापासून श्री. अमरे रंगवत आहेत. सुरवातीची काही वर्ष शहरातील पवार मंडळाच्या गोमू नृत्यामध्ये ते सहभागी झाले.

गेली काही वर्षे गुरववाडी येथील गुरवबंधू कोळी नाच मंडळाच्या गोमू नाचात ते नाखवा साकारतात. त्यांचे गोमूसोबतचे तालबद्ध नृत्य आणि चेहऱ्यावरील हावभाव साऱ्यांचीच वाहवा मिळवितात. विशिष्ट लकबीतील त्यांचे नृत्य तरुणांनाही लाजविणारे असते. दिवटेवाडी येथील बाळा मांडवकर यांच्या प्रोत्साहनामुळे अभिनय जोपासल्याचे ते सांगतात. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लक्ष्मीकांत बेर्डे यांना ते आपला आदर्श मानतात. स्वतःचा व्यवसाय सांभाळताना ते विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी होतात. सद्‌गुरू अनिरुद्ध बापूंचे ते उपासक आहेत. आपल्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये वडील मधुकर, आई पुष्पलता, पत्नी सुविधा यांच्या योगदानाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात.

 

Web Title: Ratnagiri News Rajesh Amare Special Story