भाजपचे संपर्कमंत्री राजेश सावंत यांच्या घरी

राजेश शेळके
रविवार, 14 जानेवारी 2018

रत्नागिरी - शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख, उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे. सोमवारी (ता. 15) किंक्रातीच्या मुहूर्तावर भाजपचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण हे राजेश सावंत यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. याचवेळी प्रवेशाचीही शक्‍यता आहे.

रत्नागिरी - शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख, उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे. सोमवारी (ता. 15) किंक्रातीच्या मुहूर्तावर भाजपचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण हे राजेश सावंत यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. याचवेळी प्रवेशाचीही शक्‍यता आहे.

राजेश सावंत नगरसेवकपदाचाही राजीनामा देणार असल्याने शिवसेनेचे तिघे निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. पालिकेतील भाजपची रणनीतीही बदलणार असून सावंत यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत पुन्हा आणण्याची शक्‍यता आहे. 

दृष्टिक्षेप

  • सावंत सेना नगरसेवकपदाचा देणार राजीनामा

  • सेनेकडून तिघे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक

  • भाजपच्या उमेश कुळकर्णींना पक्षीय जबाबदारी

राजेश सावंत हे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांचे अतिशय जीवाभावाचे मित्र होते. वर्षभरापासून त्यांच्यात काही कारणांमुळे जो दुरावा निर्माण झाला तो तुटण्यापर्यंत ताणला गेला. राजेश सावंत हे प्रभाग 3 मधून शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. उपनगराध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली.

दरम्यानच्या काळात उपजिल्हाप्रमुख हे पद देखील त्यांनी भूषविले. अंतर्गत वादामुळे पक्षाच्या कार्यक्रमाला ते अनुपस्थित राहू लागले. अखेर पक्षाने त्यांचा उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. त्यानंतर उपजिल्हाप्रमुखपदही काढून घेतले. त्यांच्यात आणि शिवसेनेत एक दरी निर्माण झाली. सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये जाण्याचे जवळजवळ निश्‍चित झाले आहे.

भाजपचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण सोमवारी राजेश सावंत यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. सुमारे दोन तास त्यांनी सावंत यांना दिले आहेत. त्यानंतर श्री. चव्हाण चिपळूणला जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

राजेश सावंत लवकरच नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिवसेनेतील राजन शेट्ये, प्रशांत साळुंखे, संजय पुनसकर आदी प्रभाग 3 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. राजेश सावंत यांनी सेनेचा राजीनामा दिल्यास स्वीकृत नगरसेवक उमेश कुळकर्णी यांच्या जागेवर राजेश सावंत यांना पालिकेत मागच्या दाराने घेतले जाणार आहे. श्री. कुळकर्णी यांना पक्षाची जबाबदारी दिली जाणार आहे. या सर्व राजकीय घडामोडीमुळे सेना-भाजप दोन्ही पक्षात वातावरण ढवळून निघाले आहे. उघड काही दिसत नसले तरी अंतर्गत जोरदार खलबते शिजत आहेत.

Web Title: Ratnagiri News Rajesh Swant on way to BJP