खेडेकरांवर अब्रुनुकसानीचा दावा - रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

खेड - माझ्या प्रयत्नाने केंद्र सरकारकडून विमान मंजूर करून आणले. त्यासाठी अभिनंदन करायचे सोडून बदनामी केल्याप्रकरणी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर लवकरच वकिलांच्या सल्ल्याने अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

खेड - माझ्या प्रयत्नाने केंद्र सरकारकडून विमान मंजूर करून आणले. त्यासाठी अभिनंदन करायचे सोडून बदनामी केल्याप्रकरणी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर लवकरच वकिलांच्या सल्ल्याने अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हे प्रसिद्धीपत्रक पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, शहरप्रमुख निकेतन पाटणे यांनी पत्रकारांना येथील पालिकेत दिले.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांचे उपसचिव केदार बुरांडे यांचे पत्र मुख्याधिकाऱ्यांना १६ जूनला आले. त्यात स्पष्टपणे पर्यावरणमंत्री कदम यांच्या विनंतीनुसार विमानाला मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. तरीही नगराध्यक्ष खेडेकर आणि आमदार संजय कदम यांनी बनाव करून माझ्या बदनामीचा कट रचून खोटी तक्रार खेड पोलिसांत दिली. विमानाच्या मंजुरीसाठी खेडेकर यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. केवळ नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पत्र आले, म्हणजे आपणच विमान आणले असा दावा ते करीत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

मंजुरीनंतर प्रस्ताव दिल्याच्या उल्लेखाने संभ्रम
रामदास कदम यांनी विमान मंजुरीसाठी दिलेल्या तारखांमध्ये विसंगती दिसते. पत्रकात १५ फेब्रुवारी २०१८ ला त्यांच्या स्वीय सहायकांनी दिल्लीत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. रामदास कदम यांनी त्यांच्याशी चर्चा केली व २९ जानेवारी २०१८ ला त्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. या दोन्ही तारखा विसंगत वाटतात. जानेवारीत मंजुरी मिळालेल्या विमानाचा प्रस्ताव कदम यांनी फेब्रुवारीत दाखल केल्याचे पत्रात म्हटल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

दुप्पट रकमेचा दावा ठोकणार - खेडेकर
वैभव खेडेकर म्हणाले, पर्यावरणमंत्री ठोकतील, त्यापेक्षा दुप्पट रकमेचा दावा मी त्यांच्यावर ठोकणार आहे. मंजूरीची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. हवाई दल व संरक्षण अधिकारांच्‍या चौकशीत हे कळेलच.

Web Title: Ratnagiri News Ramdas Kadam comment