कुंडी घाट फोडून पश्चिम महाराष्ट्राला जोडणार - रवींद्र वायकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

कुंडी घाट फोडून तालुक्‍याला पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडण्यात येणार आहे. आगामी काळात विकासनिधीची गंगा आणून तालुक्‍यातील बहुतांश प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहोत. बावनदी-मार्लेश्‍वर रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे, तर कुंडी घाट फोडून तालुक्‍याला पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडण्यात येणार आहे. आगामी काळात विकासनिधीची गंगा आणून तालुक्‍यातील बहुतांश प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.

देवरूख तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी वायकर बोलत होते. शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनता मोठ्या अपेक्षेने येते, त्यामुळे त्यांची कामे करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सर्वसामान्यांच्या जास्तीत जास्त समस्या एका फटक्‍यात सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.

पर्यटनातून विकास करण्यासाठी कसबा येथे शंभूराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. गणपतीपुळे ते मार्लेश्‍वर रस्ता चकाचक होणार आहे. पर्यटन क्षेत्रातील विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत. महामार्ग चौपदरीकरणातील कशेडी घाटाचे कामही लवकरच होणार असून यातून संगमेश्‍वर तालुक्‍याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

तहसीलसारख्या महत्त्वाच्या शासकीय इमारतीच्या बांधकामाला ९ वर्षे वेळ लागला याबद्दल जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. या वेळी आमदार सदानंद चव्हाण, माजी पालकमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने आदींनी मनोगत व्यक्‍त केली. कार्यक्रमाला प्रांताधिकारी अमित शेंडगे, तहसीलदार संदीप कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे आदींसह पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विशेष पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला प्रितेश मांगले यांचा सत्कार झाला.

ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
देवरूख तहसील कार्यालयाच्या बांधकामाला ९ वर्षे लागत असतील तर ही गंभीर बाब आहे. असे ठेकेदार शासकीय निधीचा अपव्यय करतात. त्यामुळे अशा ठेकेदारांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री वायकर यांनी बांधकाम विभागाला दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News Ravindra waykar comment