रिफायनरी प्रकल्पासाठीची जमीन मोजणी रोखली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

राजापूर - नाणार येथील रिफायनरी प्रकल्पासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या जमीन मोजणीला शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी विरोध करीत ती रोखून धरली. तिसऱ्या दिवशीही ती अपुरी राहिली. 

राजापूर - नाणार येथील रिफायनरी प्रकल्पासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या जमीन मोजणीला शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी विरोध करीत ती रोखून धरली. तिसऱ्या दिवशीही ती अपुरी राहिली. 

सकाळी नाणार परिसरामध्ये मोजणीला सुरवात झाली. मात्र लोकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासनाने काही तासांतच काम बंद केले. सलग तिसऱ्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये कातळावर ठिय्या मांडून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांकडून जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणांनी नाणार परिसर दणाणून गेला होता.

तिसऱ्या दिवशी सागवेसह नाणार, दत्तवाडी परिसरामध्ये जमीन मोजणी सुरू झाली. याला विरोध करण्यासाठी नाणार, सागवे, दत्तवाडी परिसरातील प्रकल्पग्रस्त मोजणीच्या ठिकाणी आधीच मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मोजणीला सुरवात होताच प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेत मोजणीला जोरदार अटकाव केला. त्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासनाने नमते घेत जमीन मोजणी थांबवली.

त्यानंतर दिवसभरामध्ये मोजणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांच्या आक्रमकतेपुढे प्रशासन हतबल झाले.लोकांचा विरोध लक्षात घेऊन पोलिसांची मदतही घेण्यात आली होती. मात्र तरीही जमीन मोजणी सुरू होऊ शकली नाही. दिवसभर प्रकल्पग्रस्तांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. प्रकल्पग्रस्त दिवसभर उन्हाची तमा न बाळगता उपाशीपोटी ठिय्या मांडून बसले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव, रिफायनरी विरोधी मुंबईच्या समितीचे अध्यक्ष अशोक वालम, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर यांनी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून आपण तुमच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगून त्यांचे मनोबल वाढविले.

ठाणेश्‍वरचा जयघोष
प्रकल्पग्रस्त जमीन मोजणीला तीव्र विरोध करण्यासाठी जमले होते. नाणारचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री ठाणेश्‍वर मंदिरानजीक झाडावर या दरम्यान सापाने फणा काढला. त्यामुळे काही काळ गलबला झाला. त्यानंतर काही मिनिटांतच प्रशासनाने मोजणी थांबविली. यानंतर ग्रामस्थांनी श्री देव ठाणेश्‍वरचा जयघोष केला.

Web Title: Ratnagiri News Refinery project issue