शेतकरी, मच्छीमार संघटनेचे राजकिय पक्षांना घेऊन रिफायनरीविरोधात आंदोलन’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

राजापूर - रिफायनरीविरोधात आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष नको, अशी भूमिका घेऊन थेट शिवसेनेशी पंगा घेतलेल्या वालम यांच्या संघर्ष समितीपेक्षा वेगळी भूमिका घेत सर्वच राजकीय पक्षांशी मिळतेजुळते घेण्याची तयारी प्रकल्पविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेने दाखविली आहे.

राजापूर - रिफायनरीविरोधात आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष नको, अशी भूमिका घेऊन थेट शिवसेनेशी पंगा घेतलेल्या वालम यांच्या संघर्ष समितीपेक्षा वेगळी भूमिका घेत सर्वच राजकीय पक्षांशी मिळतेजुळते घेण्याची तयारी प्रकल्पविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेने दाखविली आहे.

शिवसेनेने स्वतंत्र आंदोलन छेडण्याचा नारा दिल्यानंतर हा बदल झाला आहे. सर्व राजकीय पक्षांना सोबत घेतले तरी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम आणि मजीद भाटकर यांनी नेतृत्व आम्हीच करणार, असा दावा पत्रकार परिषदेत केला.

श्री. भाटकर म्हणाले की, राजकीय पक्षांचा सहभाग असला, तरी या आंदोलनाचे नेतृत्व समितीच करेल. अशोक वालम यांच्या नेतृत्वाखालील संघटना स्वतंत्र असल्याने राजकीय पक्ष वा राजकीय नेत्यांबाबतच्या त्यांच्या भूमिकेशी आपल्या संघटनेचा कोणताही संबंध नाही. मुंबई, नागपूर येथे छेडण्यात आलेल्या रिफायनरी प्रकल्पविरोधी आंदोलनामध्ये राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. याकडे लक्ष वेधले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रकल्पग्रस्तांच्या प्रकल्पविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

तालुक्‍यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पविरोधात शेतकरी, मच्छीमार संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन छेडले आहे. प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीची मोजणीही ग्रामस्थांनी आंदोलन छेडत रोखून धरली. स्वबळावर हे आंदोलन सुरू होते. 

भविष्यामध्येही प्रकल्पविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने समिती प्रयत्नशील आहे. प्रकल्पविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटना स्थानिक पातळीवर आंदोलन छेडत असताना कोकण विनाशकारी रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेच्या वतीनेही मुंबई आणि नागपूर येथे आंदोलने छेडण्यात आली.

नागपूर येथे आंदोलन छेडल्यानंतर श्री. वालम यांनी कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे न जाता प्रकल्पविरोधी काढलेली संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर प्रकल्पविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष श्री. कदम यांनी आज भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला प्रकाश ठुकरूल, यशवंत कार्शिंगकर, बाळकृष्ण हळदणकर, आनंद भडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri News Refinery project issue