कोकणची जबाबदारी सुभाष देसाईंवर

मुझफ्फर खान
बुधवार, 4 एप्रिल 2018

सेनेकडून भाजपविरोधी स्वाभिमानाची लढाई सुरू झाली आहे. या लढाईत कोकणचा गड जिंकण्याची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टाकली आहे. शिवसेना संपर्कप्रमुख विजय कदम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. 

चिपळूण - भाजपकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळे शिवसेनेचा स्वाभिमान दुखावला आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला जागा दाखविण्यासाठी पुढील सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय सेनेकडून जाहीर झाला. त्यामुळे एक प्रकारे सेनेकडून भाजपविरोधी स्वाभिमानाची लढाई सुरू झाली आहे. या लढाईत कोकणचा गड जिंकण्याची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टाकली आहे. शिवसेना संपर्कप्रमुख विजय कदम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. 

राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष बनला. मात्र २५ वर्षांच्या शिवसेना-भाजप युतीत कटुता निर्माण झाली. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला सरकारमध्येही आणि निवडणूक प्रचारातही दुय्यम वागणूक देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी टोक गाठले.

कोकणातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार आहेत. आम्ही सर्वच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. पुन्हा एकदा कोकणात शिवसेनेचा भगवा फडकेल. 
-विजय कदम,

शिवसेना संपर्कप्रमुख

हा वाद केवळ राज्यस्तरापर्यंत मर्यादित राहिला नाही, तर गल्लीपर्यंत पोचला. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप आणि शिवसेना नेते व कार्यकर्त्यांचे संबंध ताणले गेले आहेत. शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपकडून नारायण राणेंना पक्षात घेऊन मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तसे झाल्यास पाठिंबा काढून घेण्याची धमकी सेनेकडून दिली. त्यामुळे राणेंना स्वतंत्र पक्ष काढून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय झाला. 

यापुढे भाजपबरोबर युती करायची नाही असे दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेकडून राज्यात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना नेतेपदी बढती दिली  सेनेच्या मंत्र्यांवर विविध क्षेत्रांची जबाबदारी दिली आहे. कोकणातील शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे पक्षाने विदर्भाची, तर अनंत गीतेंकडे कोकणची जबाबदारी आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुभाष देसाई यांच्याकडे कोकणची जबाबदारी दिली आहे.

पक्षाअंतर्गत वाद मिटविणे तसेच पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सुभाष देसाई करणार आहेत. नुकतेच गुहागर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेऊन उद्योगमंत्री देसाई यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

Web Title: Ratnagiri News responsibility of Konkan Subhash Desai