रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन

राजेश कळंबटे
शुक्रवार, 29 जून 2018

रत्नागिरी - मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले आहे. 2006 नंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात ही घटना घडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. 

रत्नागिरी - मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले आहे. 2006 नंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात ही घटना घडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

2006 मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीही मोठे भूस्खलन झाले होते. सुमारे चार ते पाच एकर जमीन एकाचवेळी खचली होती. यात शेती, बागायती देखील उध्वस्त झाली. अशा घटनांमुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणेही कठीण झाले. काही शेतकऱ्यांनी शेती करणेही सोडून दिले. 

अशा घटनांमुळे प्रशासकीय यंत्रणाही जागी झाली होती. घटनेची दखल घेत लगोलग भेटीही दिल्या होत्या. भूवैज्ञानिकांनीही या  प्रकारची दखल घेतली होती. यावेळी त्यांनी रिंग लॅंन्डस्लाईड प्रकार असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून उपाय योजनेसाठी पाठवण्यात आला. सातत्याने पाठपुरावा करून त्याठिकाणी आपत्कालीन उपाय योजना झाली. काँक्रीटचा धुपप्रतिबंधक बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आला. त्यावर सुमारे 15 ते 20 लाख खर्च झालेत. पण उपाययोजना करूनही सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा जमीन सुमारे 100 फूट लांब आणि 15 ते 20 फूट उंच खचली आहे. अशीच जमीन खचत राहिल्यास हा धोका वाढणार आहे. यात काही एकर शेतजमीन नष्ट होण्याची भीती आहे.

जवळच भाटवडेकर तसेच वाडकरवाडी लोकवस्ती आहे. त्यामुळे हे ग्रामस्थ देखील चिंतेत आहेत. प्रशासनाने या प्रकारची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. यापूर्वी केलेली उपाययोजना अर्धवट असून आणखी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.  

दत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर,  भास्कर चव्हाण, रमेश भाटकर, भाऊ भाटवडेकर यांची शेतजमीन खचून न भरून येणारे नुकसान झाले आहे. नदीचा प्रवाह बदलल्याने आणि जमिनीखालील पाण्याच्या अंतर्गत प्रवाहामुळे हा खचण्याचा प्रकार आजही सुरु आहे.

Web Title: Ratnagiri News ring landslide due to heavy rains