सगुणा राइस टेक्‍निकसह गॅसिफायर चलप्रतिकृतीस पारितोषिक

सगुणा राइस टेक्‍निकसह गॅसिफायर चलप्रतिकृतीस पारितोषिक

दाभोळ - दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सात चलप्रतिकृती तयार करून ‘डिपेक्‍स २०१८’मध्ये सहभाग घेतला होता. पैकी सुलभ सगुणा राइस टेक्‍निक या चलप्रतिकृतीस एस-८ या विभागातून आणि आंबा रस आटविण्यासाठी भाताच्या भुशापासून चालणारे गॅसिफायर चलप्रतिकृतीस आयएसपी या विभागातून दुसरे पारितोषिक मिळाले. 

नाचणीचे मनुष्यचलित पेरणी यंत्र, सुलभ सगुणा राइस टेक्‍निक (भात पेरणी यंत्र), सुपारीच्या सालापासून काथ्या काढायचे यंत्र, आंबा रस आटविण्यासाठी भाताच्या भुशापासून चालणारे गॅसिफायर, दुधातील क्रीम काढण्याचे सौरऊर्जाचलित यंत्र, फुकट जाणाऱ्या उष्णतेचा वापर करण्यासाठी सुधारित चूल याचा समावेश होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दरवर्षी डिपेक्‍स नावाची चलप्रतिकृतीची प्रदर्शन व स्पर्धा होते. या वर्षीची ही स्पर्धा सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाली. स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून अभियांत्रिकीमधील पदविका व पदवीचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सहभागी होतात. उत्कृष्ट चलप्रतिकृतीला पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. 

भातासाठीचे पेरणी यंत्र सौरभ गिम्हवणेकर, अमोल फडवळे या प्रथम वर्ष बीएस्सी कृषीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. हे पेरणी यंत्र सगुणा राइस टेक्‍निक या भाताच्या पेरणीसाठी आहे. सगुणा राइस टेक्‍निकमध्ये १.५ मी रुंद वरंबे तयार केले जातात व दोन वरंब्यात पाण्याच्या निचऱ्यासाठी अंतर ठेवले जाते. वरंब्यावर भाताची २५ सेमी बाय २५ सेमीवर पेरणी केली जाते. पेरणीसाठी खड्डे करायला अवजार वापरले जाते.

हे अवजार वापरायला दोन माणसे लागतात. या अवजारांनी वरंब्यावर २५ सेमी बाय २५ सेमी या अंतरावर साधारण २.५ सेमी खोल व २.५ व्यासाचे खड्डे केले जातात. या खड्ड्यांमध्ये इतर दोन व्यक्‍ती हाताने भाताचे बी पेरतात व पेरलेल्या बी वर माती झाकतात. हे यंत्र एका व्यक्‍तीने चालविण्यासारखे आहे. या यंत्राने जमिनीत २५ बाय २५ सेमी वर खड्डे केले जातात व या खड्ड्यात प्रत्येकी ५-६ बिया पेरल्या जातात. नंतर यंत्राच्या साह्यानेच पेरलेल्या बियांवर माती झाकली जाते. या यंत्राच्या वापराने चार माणसांऐवजी एक माणसानेच काम होते. तसेच वेळही कमी लागतो. यंत्राची देखभाल सोपी असून वजनालाही हलके आहे. नितीन गिम्हवणेकर, सचिन महाडिक यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रा. अमित देवगिरीकर, डॉ. प्रशांत शहारे डॉ. किशोर धांदे यांनी सहकार्य केले. 

आंबा रस आटविण्यासाठी भाताच्या भुशापासून चालणारे गॅसिफायर चलप्रतिकृतीस आयएसपी विभागातून दुसरे पारितोषिक मिळाले. हे गॅसिफायर यंत्र मनीष मानकर या द्वितीय वर्ष एमटेकच्या विद्यार्थ्याने सादर केले. गॅसिफायरचा उपयोग करून फक्‍त ३.५ किलो भाताच्या भुशापासून २० किलो आंबा रस आटवू शकतो. या गॅसिफायरमध्ये हवा खेळती राहण्यासाठी १२ व्होल्ट डीसीचा पंखा आहे. त्याला १० वॅटचे सौरऊर्जेवर चालणारे पॅनल बसविले आहे. या यंत्राला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलविण्यासाठी चाके वापरता येतात. यंत्रासाठी डॉ. जे. डी. मोहोड, डॉ. यशवंत खंडेतोड, प्रा. अमित देवगिरीकर, डॉ. किशोर धांदे यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com