सांबर शिंगाची तस्करी; चिपळुणात पाचजणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

चिपळूण - सांबर शिंगाची तस्करी करणाऱ्या कोल्हापूर येथील पाचजणांना चिपळूण पोलिसांनी मुद्देमालासह बुधवारी (ता. १८) रात्री ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चिपळूण - सांबर शिंगाची तस्करी करणाऱ्या कोल्हापूर येथील पाचजणांना चिपळूण पोलिसांनी मुद्देमालासह बुधवारी (ता. १८) रात्री ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. चिपळूण पोलिसांनी यापूर्वी खवले मांजर, बिबट्याचे कातडे, रक्तचंदनाची तस्करी उघड केली होती. आता सांबर शिंगाची तस्करी उघड झाल्यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

काही तरुण सांबर शिंगाची कुंभार्ली घाटमार्गे वाहतूक आणि विक्रीसाठी चिपळूणला येणार आहेत, अशी माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर, सहायक पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवडे, उपनिरीक्षक अशोक दाभोळकर, हवालदार प्रदीप गमरे, राजेश नार्वेकर, गणेश पटेकर, दीपक ओतारी यांनी सापळा रचला होता.

शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुंभार्ली घाटातील चेकपोस्टवरही याबाबतची माहिती देण्यात आली होती. सांयकाळदरम्यान अजय रघुनाथ साळुंखे (वय ३६, रा. गोरेगाव-मुंबई, मूळ गाव कोल्हापूर), समीर राजाराम नलावडे (३४), दीपक नामदेव मुसळे (३२), राकेश रामचंद्र भोसले (३७), सागर राजाराम नलावडे (३०, रा. सर्व कोल्हापूर) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

पाचजणांना न्यायालयीन कोठडी

सांबर शिंगांची तस्करी करणारी टोळी चारचाकी गाडी (एमएच ४७ सी ८०१८) मधून दोन सांबर शिंगे घेऊन कुंभार्ली घाटातून चिपळुणात दाखल झाली. ते सांबर शिंग 
कुणाला विकणार आहेत, याची माहिती पोलिसांना घ्यायची होती म्हणून त्यांनी संशयितांना अटक न करता केवळ त्यांच्यावर पाळत ठेवली. 

रात्री बारा वाजता ते सर्वजण गुहागर बायपास नाक्‍यावरील पाण्याच्या टाकीजवळ गेले. पोलिस आपल्यावर पाळत ठेवून असल्याचे समजल्यानंतर सांबर शिंगाची खरेदी करणारे त्याठिकाणी आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी पाचही जणांना सांबर शिंगासह ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर आपल्याकडे दोन सांबर शिंग असल्याचे त्यांनी कबूल केले. बाजारात त्याची किंमत २५ हजार रुपये इतकी आहे. परिक्षेत्र वनअधिकारी सचिन निलख, वनपाल पाताडे यांनी संशयितांची चौकशी केल्यानंतर सायंकाळी न्यायालयात हजर केले. 
संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रत्नागिरी येथील जिल्हा विशेष कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली.

Web Title: Ratnagiri News Sambar shing smuggling 5 arrested