दामले कुटुंबीय जपताहेत सावरकरांच्या आठवणी

राजेश कळंबटे
सोमवार, 28 मे 2018

रत्नागिरी - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या आठवणी रत्नागिरीत जपल्या जात आहेत. त्यातील एक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर. रत्नागिरीत तेरा वर्षे त्यांनी वास्तव्य केले. प्लेगच्या साथीमुळे शहरातून शिरगावातील विष्णू दामलेंच्या एका छोट्याशा घरात ते वास्तव्यास गेले.

रत्नागिरी - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या आठवणी रत्नागिरीत जपल्या जात आहेत. त्यातील एक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर. रत्नागिरीत तेरा वर्षे त्यांनी वास्तव्य केले. प्लेगच्या साथीमुळे शहरातून शिरगावातील विष्णू दामलेंच्या एका छोट्याशा घरात ते वास्तव्यास गेले. घरातील सहा बाय बाराच्या खोलीत राहतानाही सावरकरांनी ग्रंथलेखनाबरोबर स्पृश्‍य, अस्पृश्‍य एकतेला प्राधान्य देणारे उपक्रम सुरू केले. त्यांच्या या आठवणी जपण्याचे काम दामले कुटुंबींयाच्या तीन पिढ्या करीत आहे.

शेकडो सावरकरप्रेमी या खोलीला भेट देण्यासाठी दामलेंच्या घरी येतात. श्रीकृष्ण, वैजनाथ यांच्यासह तिसऱ्या पिढीतील प्रसन्न आणि रवींद्र दामले ही मंडळी येणाऱ्या पर्यटकांना आत्मीयतेने सामोरे जातात. सावरकरांची नाळ कशी जुळली याचा इतिहास ते सर्वांपुढे ठेवतात. सावरकरांच्या हस्ताक्षरातील पत्र, एक पितळेचा दिवा आणि त्यांच्या जीवनावरील काही पुस्तके असे साहित्यही त्यांनी जपून ठेवले आहे. या खोलीतील वास्तव्यात सावरकरांनी केलेल्या कामांच्या नोंदीही त्यांनी भिंतीवर ठळकपणे लिहून ठेवल्या आहेत. त्या घरातील वास्तव्य नोव्हेंबर १९२४ ते जून १९२५ या कालावधीत होते.

शिरगावातील हनुमान मंदिरात ९ एप्रिल १९२५ ला मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यावेळी काढलेल्या दिंडीत अस्पृश्‍यांचाही सहभाग होता. सावरकरांनी तेथे हिंदू एकता गीतगायन सादर केले. सामूहिक हळदी-कुंकू, घरातील गडी माणसांना साक्षरतेचे धडे, बाबा चांभार तथा शिरगावकर यांच्या घरी सत्यनारायण पूजेला स्पृश्‍य व अस्पृश्‍यांच्या सहभागासाठी सावरकरांनी पुढाकार घेतला. ‘हिंदू पदपादशाही’ ग्रंथांचे लेखन करताना मराठी शाळेत मुलांना सरमिसळ बसविण्याची प्रथा पुढे आणली. एकतेसाठी उचललेल्या पावलासह चालताना समाजव्यवस्थेचे अनेक चटके मोरेश्‍वर दामलेंनीही सहन केले. त्या आठवणी सांगताना श्रीकृष्ण दामले भावुक होतात.

मुंबई, पुण्यासह अनेक पर्यटक येथे भेट देतात. सावरकरांच्या आठवणी तरुण पिढीसाठी आम्ही जपत आहोत.
- प्रसन्न दामले,
शिरगाव

Web Title: Ratnagiri News Sawarkar birth anniversary special