‘ॲक्‍वाटिक’च्या सहकार्याने किनाऱ्यावर सुरक्षितता ठेवणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

रत्नागिरी - गणपतीपुळे किनाऱ्यावर पोहणाऱ्यांसाठी सुरक्षित झोन तयार करण्यात येणार असून मेरीटाईम बोर्डाने त्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट ॲक्‍वाटिक ॲम्युचर असोसिएशनचे सहकार्य घेतले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस ॲक्‍वाटिकची टीम गणपतीपुळेची पाहणी करून तांत्रिकदृष्ट्या पोहण्यास असुरक्षित जागा दाखवून देणार आहे.

रत्नागिरी - गणपतीपुळे किनाऱ्यावर पोहणाऱ्यांसाठी सुरक्षित झोन तयार करण्यात येणार असून मेरीटाईम बोर्डाने त्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट ॲक्‍वाटिक ॲम्युचर असोसिएशनचे सहकार्य घेतले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस ॲक्‍वाटिकची टीम गणपतीपुळेची पाहणी करून तांत्रिकदृष्ट्या पोहण्यास असुरक्षित जागा दाखवून देणार आहे.

एप्रिल, मे महिन्याच्या पर्यटन हंगामापूर्वी तेथे सुरक्षित झोन आखले जातील, असे मेरीटाईम बोर्डाकडून सांगण्यात आले. 
डिसेंबरअखेरीस पर्यटनासाठी मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांनी गणपतीपुळे, गुहागर, दापोलीतील किनाऱ्यांना पसंती दिली होती. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी विक्रमी गर्दी झाली होती. गणपतीपुळेचा किनारा पोहणाऱ्यांसाठी धोकादायक बनला असून तेथे सुरक्षित उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

गणपतीपुळे किनारी तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित झोन तयार करण्याचे काम मेरीटाईम बोर्डाने पुण्याच्या संस्थेकडे सोपविले आहे. ते पूर्ण करून पुढील पर्यटन हंगामापर्यंत या किनाऱ्यांवर सुरक्षित झोन तयार केले जातील.
- कॅ. संजय उगलमुगले,
प्रादेशिक बंदर अधिकारी

गेली दोन वर्षे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. किनाऱ्यावर जीवरक्षकही नेमण्यात आले, परंतु पर्यटकांची संख्या अधिक आणि जीवरक्षक मोजकेच अशी स्थिती आहे. पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन गणपतीपुळे ‘सेफ्टी’ झोन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. चिवला (सिंधुदुर्ग) बीच येथे हा प्रयोग केला जात आहे. त्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट ॲक्‍वाटिक अम्युचर असोसिएशनची मदत घेण्यात आली आहे. त्या बीचवर धोकादायक झोन तयार करून तेथे पोहण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. त्याचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. या महिन्याच्या अखेरीस त्या असोसिएशनचे पथक गणपतीपुळेची पाहणी करणार आहे.

गणपतीपुळेचा किनारा मोठा आहे. दोन डोंगरांमध्ये असल्याने भरती-ओहोटीच्या विशिष्ट वेळी तेथे चाळ निर्माण होते. त्यात पोहणारा पर्यटक अडकला तर तो बुडतो. याच बाबींचा अभ्यास करून तेथे पोहण्यास प्रतिबंध झोन तयार केले जाणार आहेत. हे काम थोडे उशिरा होत असले तरीही तांत्रिकदृष्ट्या काम करणाऱ्या संस्था आपल्याकडे कमी आहेत. फेब्रुवारी महिन्यात पुण्याच्या संस्थेकडून कार्यवाही केली जाईल. एप्रिल, मे महिन्यातील पर्यटन हंगामात पर्यटक वाढले तर त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येतील.

Web Title: Ratnagiri News security on beach with help of aquatic