समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा २६ ग्रामपंचायतींच्या खांद्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

रत्नागिरी - किनारी भागातील २६ ग्रामपंचायतींवर किनापट्टीच्या सुरक्षिततेचा भार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पर्यटन विकास आणि मेरीटाईम बोर्डाच्या निर्मल सागर तट अभियानामुळे किनारी भागाने सुंदर रूप धारण केले आहे. पर्यटकांचा ओढा वाढला आहे.

रत्नागिरी - किनारी भागातील २६ ग्रामपंचायतींवर किनापट्टीच्या सुरक्षिततेचा भार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पर्यटन विकास आणि मेरीटाईम बोर्डाच्या निर्मल सागर तट अभियानामुळे किनारी भागाने सुंदर रूप धारण केले आहे. पर्यटकांचा ओढा वाढला आहे.

पर्यटकांना समुद्र स्नानाचा मोह होतो. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सागरी जीवरक्षक असणे गरजेचे आहे. याचा विचार करून २६ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २ जीवरक्षक नेमण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश आहेत. मेरीटाईम बोर्डचा २५ टक्के निधी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षकांवर खर्च होणार आहे. मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले यांनी याला दुजोरा दिला. 

गोव्याप्रमाणे जिल्ह्यालाही सागरी किनारा लाभला आहे. अनेक किनारे आकर्षक आहेत. मात्र अस्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे ते दुर्लक्षित राहिले आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पर्यटन विकास आणि मेरीटाईम बोर्डाच्या निर्मल सागर तट अभियानाने अशक्‍य ते शक्‍य करून दाखविले आहे. त्यामुळे किनाऱ्यांचे सौंदर्य वाढले आहे.  

गणेशगुळेपासून कोळथरे बीचपर्यंत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच स्वच्छ आणि सुंदर किनारा ठेवण्यासाठी राज्याच्या मेरीटाईम बोर्डाने निर्मल सागर तट अभियान ही स्पर्धा घेण्याचे ठरविले. यासाठी ५० लाखाचे पहिले बक्षीस आहे. जे गाव अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी करणार त्याला हे पारितोषिक मिळणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी मेरीटाईमने १०० टक्के निधी २६ ग्रामपंचायतींना पुरविला आहे.  

स्वच्छता, चेजिंग रूम, स्वच्छतागृहालय, पार्किंग, एलईडी लाईट, पर्यटक बेंचेस, गार्डन, ओपन जिम आदी सुविधा या निधीतून निर्माण केल्या जाणार आहेत. यातून वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या गावाला निर्मल सागर तट अभियानाचे पारितोषिक दिले जाणार आहे. कोकणात पर्यटकांची वाढती संख्या आहे. पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. गणपतीपुळे येथे सर्वाधिक जीवरक्षकांची गरज आहे.

येथील धोकादायक किनाऱ्यावर पर्यटक बुडाल्याच्या घटना सतत घडतात. यावरही गांभीर्याने विचार झाला आहे. त्या-त्या गावातीलच तरुण जीवरक्षक म्हणून नेमण्यात येणार आहेत. निवडलेल्या जीवरक्षकांना गोवा येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या अध्यक्षतेखाली २६ ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी (ता. २८) बैठक  झाली. यावेळी अभियानाचा आढावा घेण्यात आला. 

Web Title: Ratnagiri News Security of beaches issue