चिपळुणात राष्ट्रवादीचे ‘सेल्फी विथ खड्डे’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

चिपळूण - खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे रस्त्यांनी प्रवास करणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. रस्त्यांच्या दयनीय परिस्थितीमुळे खड्डयात गेला मुंबई-गोवा महामार्ग असे म्हणण्याची वेळ तालुक्‍यातील सर्वसामान्यांवर आली आहे. रस्त्यांच्या खड्डेमय स्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्‍यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘सेल्फी विथ खड्डेमय रस्ते’ हे अभियान राबविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, महिला राष्ट्रवादी युवक, युवक व युवती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्‍यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन रस्त्यावरील खड्ड्यांसह सेल्फी फोटो काढले आहेत. खड्ड्यांबरोबर काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकून सरकार आणि नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. 

‘सेल्फी विथ खड्डे’ या मागचा हेतू कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी नसून तालुक्‍यातील रस्त्यांची दयनीय स्थिती संबंधित सार्वजनिक बांधकाम प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना जाग यावी. यासाठी गांधीगिरी मार्गाने केलेले आंदोलन आहे, अशी प्रतिक्रिया युवकचे जिल्हा प्रवक्ते जमीर मुल्लाजी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आंदोलन सुरू केले. राज्यात आम्ही त्याची अंमलबजावणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून कायमच मोठ्या प्रमाणावर अवजड, सामान्य व सार्वजनिक वाहतूक होत असते. त्यामुळे उखडलेल्या रस्त्यांमुळे काही प्रमाणात अपघातांची संख्या वाढली आहे. किरकोळ अपघात तर रोजच होत आहेत. त्यामुळे रस्ते दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. पंचायत समितीच्या सभापती सौ. पूजा निकम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देण्यात आली. पावसाळा संपल्यानंतर रस्ते दुरुस्ती हाती घेतली जाईल, असे आश्‍वासन अधिकऱ्यांकडून देण्यात आले होते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यामुळे हा मार्ग आम्ही स्वीकारल्याचे श्री. मुल्लाजी यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Selfie With Potholes