श्‍यामच्या आईच्या गोष्टी भावतात सातासमुद्रापार

श्‍यामच्या आईच्या गोष्टी भावतात सातासमुद्रापार

दापोली - पालगड येथील मुलांमध्ये मातृभक्ती प्रबळ जाणवते. मातृहृदयी साने गुरुजींचे हे गाव आणि त्यांच्यावर संस्कार करणारी श्‍यामची आई अर्थात यशोदाबाई यांचेही जन्मगाव. गुरुवारी (ता. २) यशोदाबाईंची पुण्यतिथी. श्‍यामच्या आईचे संस्कार पिढ्यान्‌पिढ्या सुरू आहेत. त्यातच भर पडते ती गुरुजींच्या कथा मुलांना सांगण्याने. या कथांचा प्रभाव मुलांच्या वर्तनातून दिसून येतो. मातृभक्ती यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे मुलांच्या मनावर बिंबविण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे मत शिक्षिका मेघना माधव जोशी यांनी मांडले. श्‍यामच्या आईच्या या गोष्टी सातासमुद्रापारही मुलांना तेवढ्याच भावतात.

पालगडमध्ये परचुरे कुटुंबात यशोदाबाईंचा जन्म झाला. साने गुरुजींना आई यशोदाबाई यांचा सहवास अवघा १८ वर्षे मिळाला. लहानपणापासूनच छोट्या पंढरी (गुरुजींचे लहानपणीचे नाव) वर त्यांनी फार मोलाचे संस्कार केले. लहान वयातील शारीरिक मानसिक जडणघडण करण्याची जबाबदारी यशोदाबाईनी छोट्या छोट्या कृती आणि गोष्टीतून पार पाडली. 

लहान वयात आईने दिलेल्या या शिकवणुकीने गुरुजींच्या स्वभावात सात्विकता, सालसपणा, कष्ट करण्याची तयारी असे गुण आले. पायाला घाण लागू नये म्हणूनही जप, खोट कधी बोलू नये, कोणत्याही प्रकारचे काम करण्याची लाज बाळगू नको, अशा अनेक गोष्टी लहानपणीच रुजवण्यात यशोदाबाई यशस्वी झाल्या. 

मुलावर प्रेम केले पण चूक घडल्यास कठोर शिक्षाही दिली. यामुळे मोठेपणी गुरुजी सत्यनिष्ठ, परोपकारी आणि प्रामाणिक बनले. यशोदाबाईच्या मृत्यूनंतर शंभर वर्षे उलटूनही पालगडमधील माता त्यांनी गुरुजींवर केलेले संस्कार आपल्या कुटुंबात मुलांचे संगोपन करताना विसरत नाहीत.

माहेरवाशिणी हे संस्कार सासरी नेतात. येथील सुना आपल्या सासूकडून हा वारसा घेतात. पालगड येथील शरद रावजी केळकर कुटुंबीयांचे गुरुजींशी कौटुंबिक संबंध होते. गुरुजी पालगड येथे आल्यानंतर केळकर यांच्या घरी उतरत असत. याच कुटुंबातील वसुधा केळकर-पटवर्धन सध्या सॅंनफ्रान्सिस्को येथे स्थायिक आहेत.

विवाहानंतर त्या नाशिक येथे अर्थशास्त्र मुलांना शिकवत. यावेळी त्या मुलांना साने गुरुजींच्या ‘श्‍यामची आई’ या पुस्तकातील दोन पाने नित्यनेमाने वाचून दाखवत. क्‍लासमध्ये गडबड करणारी मुलेही वाचनादरम्यान शांत राहत. अमेरिकेत गेल्यानंतर सौ. वसुधा यांनी तेथे प्राथमिक शाळा सुरू केली. या भागात राहणाऱ्या मराठी कुटुंबातील लहान मुलांना ‘श्‍यामची आई’ या पुस्तकातील कथा त्या वाचून दाखवतात. त्याचाही चांगला प्रभाव पडतो, असे पालकांनी सांगितले.

अस्पृश्‍यता आमच्या घरात १०० वर्षांपूर्वीही पाळली जात नव्हती. असे अनेक संस्कार आमच्यावर झिरपत झाले आणि आजही ते तसेच पुढे जात आहेत.
- मंगला मुकुंद आपटे, पालगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com