दागिने गहाण ठेवून स्वमेहनतीतून बचत गट महिलांनी उभे केले दुकान

मयुरेश पाटणकर
सोमवार, 16 एप्रिल 2018

गुहागर - ही कथा आहे वेलदूरच्या योगेश्वरी महिला बचत गटाच्या इच्छाशक्तीची. बँकेचे कर्ज मंजूर होईपर्यंत स्वत:चे दागिने गहाण ठेऊन या महिलांनी भांडवल उभे केले. दुकान बांधताना मजुरी कमी व्हावी म्हणून 15 दिवस मेहनतही त्यांनी घेतली. पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वा त्यांनी दुकान सुरू करुन ते फायद्यातही आणले. 

गुहागर - ही कथा आहे वेलदूरच्या योगेश्वरी महिला बचत गटाच्या इच्छाशक्तीची. बँकेचे कर्ज मंजूर होईपर्यंत स्वत:चे दागिने गहाण ठेऊन या महिलांनी भांडवल उभे केले. दुकान बांधताना मजुरी कमी व्हावी म्हणून 15 दिवस मेहनतही त्यांनी घेतली. पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वा त्यांनी दुकान सुरू करुन ते फायद्यातही आणले. 

योगेश्वरी महिला बचत गटातील सदस्या दर महिन्याला वर्गणी गोळा करत. ते पैसे एकमेकीला मदतीच्यारुपाने देत. आपण वेगळे काय करु शकतो याचा विचार त्या करत होत्या. त्याचवेळी अनुलोम सेवक प्रथमेश पोमेंडकर यांच्याशी गटातील महिलांची ओळख झाली. आम्हांला काहीतरी उद्योग उभा करायचा आहे अशी विचारणा महिलांनी केली. जनसेवक प्रथमेश पोमेंडकर यांनी या गटाला व्यवसाय मार्गदर्शन आणि बचत गटासाठी असलेल्या योजनांची, कर्ज उभारणीसाठी महिला समृध्दी योजना याची माहिती दिली.

यावर या महिलांनी धोपावे फेरीबोट - वेलदूर मार्गावर नवानगर येथे दुकान काढण्याचा निर्णय घेतला. श्री. पोमेंडकर यांनी त्यासाठी दुकान कसे असावे, कमी खर्चात ते कसे उभे राहु शकते. दुकानासाठी पैसे उभे करणे, जाहीरात करणे, बँकेत ओळख करुन देणे आदी कामात महिलांना साह्य केले. 

बँकेतून कर्ज मिळेपर्यंत बचतगटाच्या सदस्यांनी स्वत:चे दागिने बँकेत गहाण ठेवून  1 लाख 50 हजारचे भांडवल उभे केले. त्यातून दुकान बांधले. मजुरीत पैसे जावून नयेत म्हणून 10 महिला 2 कारागिरांसोबत 15 दिवस मेहनत करत होत्या.  दुकानाचे काम पूर्ण झाल्यावर साहित्याची खरेदी करुन महिनाभरात दुकान सुरू केले. वेलदूरमधील कोकण विदर्भ बँकेते कर्ज मंजूर केल्यावर गहाण दागिने सोडविले. 

वेलदूर, नवानगर मधील ग्रामस्थांबरोबर पर्यटकांच्या रुपानेही योगेश्वरी महिला बचत गटाच्या दुकानाला ग्राहक मिळाले आहेत.  या महिला रोज दिड तास दुकानासाठी देतात. दिव्या दाभोळकर हिशोब सांभाळतात. दिवसाला 1500 ते 1600 रुपये व्यवसाय होतो. फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात 20 हजार रुपये या महिलांनी कर्जखात्यात भरले आहेत. दोन वर्षात कर्जमुक्त होण्याचा त्याचा मानस आहे. 

पर्यटकांसाठी कोकण उत्पादने ठेवण्याचे नियोजन आम्ही करत आहोत. थंड पेयांबरोबर कैरी पन्हे, काजु, कोकम, करवंद, जांभुळ ही सरबते ठेवणार आहोत. सध्या मागणीनुसार पापड करुन देतो. हळुहळु पापडाचा व्यवसायही वाढवणार आहोत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्हाला अमोल काटकर, ग्रामविकास अधिकारी राजाराम कुळे आणि प्रथमेश पोमेंडकर यांचे मार्गदर्शन मिळाले. 

- दिव्या दाभोळकर, सदस्या योगेश्वर महिला बचत गट, वेलदूर

योगेश्वर महिला बचतगट

मोहिनी पटेकर (अध्यक्ष), नेहा बुरोंडकर (सचिव), सुलोचना धोपावकर, प्रिया पटेकर, दिपश्री दाभोळकर, त्रिशा पटेकर, शितल दाभोळकर, श्रीमती सरस्वती पटेकर, संचिता पटेकर, दिव्या दाभोळकर (सदस्य)

Web Title: Ratnagiri News shop opened with jewelry mortgage