श्री व्याघ्रांबरी बचत गटाची गांडूळ खतातून स्वयंपूर्णता

मयूरेश पाटणकर
बुधवार, 18 एप्रिल 2018

गुहागर - दोन लाखांच्या कर्जाची परतफेड, चार लाखांचे स्थिर भांडवल आणि दरवर्षी सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न तालुक्‍यातील असगोलीच्या श्री व्याघ्रांबरी स्वयंसहाय्यता बचत गटाने मिळवले. गांडूळ खत प्रकल्पातून मिळालेल्या या उत्पन्नाखेरीज बचत गटाने सामूहिक शेतीचा प्रयोगही यशस्वी केला.

गुहागर - दोन लाखांच्या कर्जाची परतफेड, चार लाखांचे स्थिर भांडवल आणि दरवर्षी सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न तालुक्‍यातील असगोलीच्या श्री व्याघ्रांबरी स्वयंसहाय्यता बचत गटाने मिळवले. गांडूळ खत प्रकल्पातून मिळालेल्या या उत्पन्नाखेरीज बचत गटाने सामूहिक शेतीचा प्रयोगही यशस्वी केला.

गेली १२ वर्षे १० महिलांनी एकत्र येऊन केलेल्या आर्थिक उन्नतीतून स्वयंरोजगाराचा वस्तुपाठच दिला आहे. या कार्यावर श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्काराची मोहोर उमटली आहे.

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत १ जानेवारी २००४ ला सुजाता कावणकर, सौ. अनिता कावणकर, सौ. सुलभा रामाणे, सविता कोळंबे, विजया कोळंबे, पानगले, तारामती पानगले, राधिका घाणेकर, रंजना कावणकर व वंदना कावणकर या महिलांनी महिला बचत गट स्थापला.

सुरुवातीला मासिक वर्गणी काढली. सदस्यांना औषधोपचार, घरगुती अडचणी आणि शौचालय बांधण्यासाठी कर्ज दिले. नियमित परतफेडीची महिलांना सवयच लागली. बॅंक ऑफ इंडिया गुहागर शाखेने गांडूळ खताच्या प्रकल्पासाठी २ लाख कर्ज दिले. पहिली ३ वर्षे ६५ टन गांडूळ खताची निर्मिती केली. ५ हजार रुपये प्रतिटन या भावाने खत विकले. त्यातून उत्साह वाढला. बचत गट कर्जमुक्त झाला. आता १०० ते १२५ टन गांडूळ खताची निर्मिती हा बचत गट करतो. गांडूळ खताला आता किलोमागे १० रु. दर मिळतो. 

गटाबाहेरील महिलांनादेखील प्रकल्पात काम दिले जाते. प्रत्येक महिलेला मजुरी दिली जाते. गांडूळ खताचे मार्केटिंगही बचत गट करतो. प्रकल्पातून गेल्या १२ वर्षांत ६ लाख ३३ हजारांचा निव्वळ नफा या बचत गटाने कमाविला. प्रत्येक सदस्याला १० लाख ९५ हजार ८०० रुपये मिळाले. 

बॅंकेतील बचत गटाची गंगाजळीही वाढत आहे. शासनाच्या राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने व्याघ्रांबरी स्वयंसहाय्यता बचत गटाला सन्मानित करण्यात आले आहे. 

सुरवातीच्या काळात कमी जास्त काम करण्यावरून थोड्या कुरबुरी झाल्या. घरातही तणाव होत असे. मात्र नेटाने मेहनत करून बचतगट फायद्यात आला. उत्पन्न मिळू लागले. मान, प्रतिष्ठा मिळू लागली. आता सामूहिक शेती आणि भाजीपाला लागवड फायद्यात करण्यासाठी आम्ही झटतो आहोत. 
- सुजाता कावणकर,
अध्यक्ष,
श्री व्याघ्रांबरी स्वयंसहाय्यता बचत गट, असगोली

२०१६-१७ या आर्थिक वर्षातील उलाढाल : 

  • ३६ टन गांडूळ खत विक्री * ८०००/- = रु. २,८८,०००/-
  • मजुरी (गट सदस्यांना) (३६४ दिवस ) = ६८,४००/- 
  • मजुरी (गटाबाहेरील महिलांना) (२००/दिवस)= २०,०००/-
  • एकूण मजुरी =  ८८,४००/-
  • वाहतूक खर्च =  २४,०००/-
  • एकूण खर्च =  १,९२,०००/-
  • निव्वळ नफा = ९६,०००/-

आधुनिकतेकडे वाटचाल
बचत गटाने यंत्राद्वारे गांडूळ खत चाळणे, पॅकेजिंगसाठी छापील आकर्षक पिशव्या वापरणे, वजन करून पिशव्या शिवणारे यंत्र अशा आधुनिक यंत्राची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठेत श्री व्याघ्रांबरी महिला बचत गटाचा गांडूळ खत हा ब्रॅण्ड त्यांना विकसित करायचा आहे. 

चारसूत्रीमुळे दरवर्षी भातपिकात ५० क्विंटलने वाढ
या बचत गटाने असगोलीमधील कांचनस्वामी महिला बचत गट आणि काही ग्रामस्थांना सोबत घेऊन चारसूत्री भात लागवड यशस्वी केली आहे. स्वमालकीसह अन्य शेतकऱ्यांची शेतजमीन भाडेकराराने घेऊन या महिला सामूहिक शेती करतात. चारसूत्रीमुळे दरवर्षी भातपिकात ५० क्विंटलने वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. भाताचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेसह खरेदी-विक्री संघात दिले जाते. गावातील प्रगतिशील शेतकरी नित्यानंद झगडे, गजेंद्र पौनीकर थेट शेतात जाऊन त्यांना मार्गदर्शन करतात. 
 

Web Title: Ratnagiri News Shri Vyharthambari Groups self sufficiency from wormy compost