मी आज सबलेफ्टनंट झालो - शुभम खेडेकर

मकरंद पटवर्धन
रविवार, 27 मे 2018

शुभमने लहानपणी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. संचलन पाहताना त्याच्या उत्कंठावर्धक प्रवासाचे क्षण आठवत होते. आम्हाला अत्यानंद झालाय.

- सौ. दीप्ती खेडेकर

रत्नागिरी - “मी आज सबलेफ्टनंट झालो. खूप छान वाटतंय. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला मान मिळाला. हा एक बेंचमार्क मी सेट केला. आता लोकांना कळेल की असंही एक फिल्ड असतं. यातून रिस्पेक्ट, ऑनर मिळतो. सैनिक स्कूल व एलिमला-केरळच्या इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीत 4 वर्षांचे प्रशिक्षण लक्षात राहण्यासारखे आहे. हे अनुभव मी शब्दांत सांगू शकत नाही.” या भावना आहेत, सबलेफ्टनंट शुभम खेडेकर याच्या.

चार वर्षे नेव्हल, बी. टेकचे शिक्षण पूर्ण करून त्याने पदवी संपादन केली. शुभमची आई दीप्ती व वडील देवदास खेडेकर यांना त्याच्या खांद्यावर क्लिप लावण्याचा मान मिळाला. आता शुभम 40 दिवस युरोपला डिप्लॉयमेंटसाठी जाणार आहे. तत्पूर्वी तो रत्नागिरी परटवणे येथील निवासस्थानी येणार आहे.

एलिमला येथे 137 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. तत्पूर्वी कराटे, घोडेस्वारी, आगीतून उड्या मारणे अशी धाडसी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर पदवी प्रदान सोहळा झाला. त्यानंतर सर्व आईवडिलांना सबलेफ्टनंटची क्लिप लावण्याचा सन्मान मिळाला. सकाळी 6.30 वाजता संचलन पाहण्यासाठी शुभमचे नातेवाइक, हितचिंतक उपस्थित होते. सातारा सैनिक स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण करून शुभमने बी. टेकला प्रवेश घेतला. यूपीएससी, एसएसबी या परीक्षांमध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाला आहे. सबलेफ्टनंट शुभममुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

शुभमने लहानपणी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. संचलन पाहताना त्याच्या उत्कंठावर्धक प्रवासाचे क्षण आठवत होते. आम्हाला अत्यानंद झालाय.

- सौ. दीप्ती खेडेकर

 

 

Web Title: Ratnagiri News Shubham Khedekar success story