गणपतीपुळेत बुडणाऱ्या सांगलीच्या दोघांना वाचवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज सायंकाळी आणखी दोन पर्यटकांना बुडता बुडता वाचविण्यात स्थानिकांना यश आले; पण या रोजच्या घटनांना थांबवायचे कुणी या गंभीर आणि गहन प्रश्‍नावर विचार करायला सुरक्षा यंत्रणांना वेळच नाही.

गणपतीपुळे -  समुद्रात पोहण्याचे आकर्षण असलेल्या पर्यटकांनी येथील जीवरक्षक, स्थानिक आणि वॉटरस्पोर्टस्‌ चालकांच्या नाकीनऊ आणले आहे. धोक्‍याच्या सूचनांना फाटा देत अतिउत्साहाने पर्यटक समुद्रात उतरून मृत्यूला निमंत्रण देत आहेत. 

दिवाळीच्या सुटीत दरदिवशी ‘बुडणाऱ्याला वाचवले’ अशा घटना घडत आहेत. परंतु पोलिस, जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा परिषदेने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. मोठी दुर्घटना घडण्याची ते वाट पाहत आहेत की काय, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे.गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज सायंकाळी आणखी दोन पर्यटकांना बुडता बुडता वाचविण्यात स्थानिकांना यश आले; पण या रोजच्या घटनांना थांबवायचे कुणी या गंभीर आणि गहन प्रश्‍नावर विचार करायला सुरक्षा यंत्रणांना वेळच नाही.

महूद (जि. सांगली) येथील अण्णा दत्ता जाधव (वय २४) व सोमनाथ दशरथ जाधव (वय ३०) हे दोघे आज बुडता-बुडता वाचले. पोहण्याच्या मोहात खोल समुद्रात ते गेले. गणपतीपुळे येथे समुद्राच्या मोठ्या चाळात ते सापडले आणि बुडू लागले; मात्र आरडाओरड झाल्यानंतर येथील ग्रामपंचायतीचे जीवरक्षक रोहित चव्हाण, अनिकेत राजवाडकर, सानिका वॉटर स्पोर्टस्‌चे मालक प्रमोद डोर्लेकर, नाना डोर्लेकर यांनी दोघांनाही बुडताना चाळातून बाहेर काढले.

दिवाळीची सुटी असल्याने गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात पर्यटकांची दररोज तोबा गर्दी असते. अगदी भाऊबीजेपासून आजपर्यंत एक-दोघेजण बुडता बुडता वाचताहेत; मात्र जीवरक्षक व व्यावसायिक पर्यटकांवर लक्ष ठेवून असल्याने कोणाचा जीव गेलेला नाही. डेंजर झोनचे बॅरेकेट लावा किंवा मोठा बोर्ड लावा, याकडे कानाडोळा करून व येथील जीवरक्षक तसेच पेट्रोलिंग करणारे पोलिस यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे रोज हे प्रकार घडत आहेत. तीर्थक्षेत्राचे नाव बदनाम होऊ नये, यासाठी पोलिस, ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद या यंत्रणांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. तरच भविष्यातील एखाद्या मोठ्या दुर्घटनेला तोंड द्यावे लागणार नाही.

Web Title: ratnagiri News sinking incident on Ganapatipule sea beach