कुर्धे येथे सहा वर्षांचा नर बिबट्या जेरबंद

सुधीर विश्‍वासराव
बुधवार, 4 एप्रिल 2018

पावस - रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील एका आंबा कलमाच्या बागेजवळ लावण्यात आलेल्या फासकीत बिबट्या अडकला. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याची तत्काळ सुटका करून पिंजर्‍यात जेरबंद केले.

पावस - रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील एका आंबा कलमाच्या बागेजवळ लावण्यात आलेल्या फासकीत बिबट्या अडकला. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याची तत्काळ सुटका करून पिंजर्‍यात जेरबंद केले. त्यानंतर त्याला सुरक्षितस्थळी सोडण्यात आले. हा बिबट्या सहा वर्षांचा नर जातीचा आहे.

कुर्धेतील खोताची वाडी येथील कराराने देण्यात आलेल्या आंबा कलम बागेजवळ पाणदळीतील फासकीत आज सकाळी बागेतील गुरखा बागेत फिरत होता. त्याला दुसर्‍या गुरख्याने हाक मारल्याने तो जात असताना बिबट्याने डरकाळी फोडली. त्या वेळी बिबट्या अडकूनही त्याला कोणतीही इजा झाली नाही.

त्यानंतर गुरख्याने मालकाला माहिती दिली. वन विभागाला संबंधित माहिती देण्यात आली. नंतर अधिकारी पिंजर्‍यासह दाखल झाले. बर्‍याच वेळानंतर बिबट्याची त्याची सुटका केली आणि पिंजर्‍यात जेरबंद केले.

दुपारनंतर पिंजरा वन खात्याचे अधिकारी घेऊन रवाना झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. गेले दोन-तीन वर्षे या परिसरात बिबट्याचा सतत वावर होता. अनेक गुरे, कुत्रे त्याने फस्त केले आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत होते. तीन वेळा ग्रामस्थांवरही हल्ला झाला होता. एकदा बिबट्याने विहिरीतून पलायन केले होते. त्यामुळे भीतीचे वातावरण कायम होते. बिबट्या सापडल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Ratnagiri News six years male leopard in Kurdhe