गणपतीपुळ्यातील संकटविमोचक स्वतःही असुरक्षित

गणपतीपुळ्यातील संकटविमोचक स्वतःही असुरक्षित

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची नैसर्गिक रचना फार वेगळी आहे. ठरावीक कालावधीत समुद्राच्या पाण्याचे दोन प्रवाह एकत्र येतात. वेगाने ते पाणी परत जाताना चाळ (खड्डा) तयार होतो. या पाण्याला प्रचंड करंट असतो. त्यात एकदा सापडला तर पट्टीचा पोहणाऱ्याच्या पायाखाली काही लागत नाही. त्यामुळे तो गडबडून जातो. घाबरून पाण्यात जोराने हात-पाय मारतो. चाळ संपण्यापूर्वीच तो पोहून थकतो आणि गटांगळ्या खात बुडतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी फक्त स्थिर पोहत राहावे लागते. चाळ संपल्यानंतर पाणी शांत होऊन यातून बाहेर पडता येते; पण हे तंत्र वापरण्याइतके डोके स्थिर नसते. बुडणारा प्रचंड घाबरलेला असतो. न घाबरणारा आपला जीव वाचवू शकतो, अशी माहिती गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिकांनी ऊर्फ संकटमोचकांनी ‘सकाळ’ला दिली. आजवर शेकडो पर्यटकांना वाचवले असले तरी कृतज्ञतेपोटी नंतर हाक मारणारा अपवादानेच एखादा, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कुंभमेळ्यात धावत येऊन वाचवल्याची आठवण ठेवत पाय धरल्याच्या प्रसंगाने आजवर केलेल्या कामगिरीची पावती मिळाल्यासारखे वाटते, असे सांगणारे संकटविमोचक मात्र स्वतःही सुरक्षित नाहीत.   

कोकणात येणारा पर्यटक गणपतीपुळ्याला भेट दिल्याशिवाय त्याचे कोकणचे पर्यटन पूर्ण होत नाही. तेथे गेल्यानंतर समुद्र स्नानाची तीव्र इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. पर्यटकांच्या या अतिउत्साहामुळेच या किनाऱ्यावर दिवाळीच्या सुटीपासून आजपर्यंत सुमारे ३० पर्यटक बुडत होते. हे धैर्य दाखवतात गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिक आणि वॉटर स्पोर्टचालक, रोहित चव्हाण, उमेश महादये, अनिकेत राजवाडकर, अक्षय माने, राज देवरूखकर, नाना डोर्लेकर, सुरेश पवार, दिनेश थावरे, शरद मयेकर, सचिन धामणस्कर, महेंद्र झगडे, वीरू सुर्वे आदी. सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायत, पोलिस, जिल्हा प्रशासन, गणपतीपुळे संस्थान आदींनी उपाययोजना केल्या आहेत; परंतु त्या तोकड्या पडतात. त्यांच्याकडे अत्यल्प साधनसामग्री आहे. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून हे संकटमोचक बुडणाऱ्या पर्यटकांना जीवदान देण्याचे काम निमूटपणे करीत आहेत. 

बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्याचे काम अतिशय जोखमीचे आणि धाडसाचे आहे. कोणी एक हे मदत कार्य करून शकत नाही. सांघिक काम करूनच आम्ही बुडणाऱ्यांचे जीव वाचवतो. एखादा बुडत असताना आमच्यापैकी एक किंवा दोघे पोहत त्याच्यापर्यंत पोचतात. तोवर अन्य दोघे सेफ्टी रिंग, दोरी घेऊन त्याच्यापर्यंत पोचतात. बुडणाऱ्याला रिंग दिल्यानंतर त्याला दोरीने बाहेर ओढून काढतो; मात्र पाण्यावर वेगाने धावणाऱ्या रेस्क्‍यू बाईकने आता हे काम सोपे झाले आहे. वॉटर स्पोर्टचालकांमुळे बुडणाऱ्या एखाद्याने मदतीसाठी हाक मारल्यास तत्काळ सेफ्टी रिंग घेऊन त्याला वाचवले जाते. 

सौजन्यही दाखवले जात नाही
गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्यांना वाचविण्याचे काम गेली पंधरा ते वीस वर्षे सुरू आहे. शेकडो लोकांना आम्ही जीवदान दिले आहे; मात्र जीव वाचल्यानंतर एखादा अपवाद वगळता कोणीही सौजन्य म्हणून कधी फोन केला किंवा विचारपूस केली नाही. एक उदाहरण मात्र आहे, कुंभमेळ्याला जय गणेश जीवरक्षकांची टीम गेली होती. तेव्हा आम्हाला तेथे पाहून रांगेत उभा असलेल्या आणि गणपतीपुळ्यात जीव वाचवलेल्या एकाने आम्हाला पाहताच पळत येऊन आमचे पाय धरले होते, हे उदाहरण क्वचितच, अशी प्रतिक्रिया या संकटमोचकांनी दिली.

संकटमोचकच मोठ्या संकटात
गणपतीपुळ्यातील संकटमोचकच मोठ्या संकटात आहेत. एखाद्याचा जीव वाचवत वाचवता त्यांच्याबाबत दुर्घटना घडल्यास त्यांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ना विम्याचे संरक्षण, ना कोणते ओळखपत्र, ना कोणती मदत. जिल्हा प्रशासन किंवा पोलिसांकडून फक्त एक पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातो. तो सत्कार स्वीकारण्यासाठी आम्हाला काही पैसे खर्च करावे लागतात; परंतु आम्हाला आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीने काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. 

...याची आहे गरज
पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत उपाययोजना प्रचंड तोकड्या आहेत. जीवरक्षकांची संख्या वाढविण्याची गरज आहे. सॅण्ड बाईक (वाळूवर चालणारी दुचाकी) हवी, बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांची मोठी मदत होते. त्यांना तेथून हटवू नये, ध्वनिक्षेपकाची गरज आहे, शिटीचा आवाज जात नाही. शासन, जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

प्रथमोपचाराकडे दुर्लक्ष
गणपतीपुळे समुद्रकिनारी बुडणाऱ्या एखाद्याला वाचवल्यास तेथे प्रथमोपचार पेटी नाही. आरोग्य उपकेंद्र असून नसल्यासारखे आहे. तेथे वैद्यकीय अधिकारीच नाही. उपचारासाठी रुग्णांना मालगुंडला न्यावे लागते. हे अंतर मोठे असल्याने रुग्ण दगावण्याची शक्‍यता अधिक असते. या महत्त्वाच्या सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे या संकटमोचकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com