मार्लेश्‍वर यात्राकाळात एसटी पायथ्यापर्यंत नेण्यास परवानगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

देवरूख - यावर्षी श्री क्षेत्र मार्लेश्‍वर यात्रोत्सवासाठी देवस्थानापासून २ किमी अंतरावर खासगी वाहनांसाठी पार्किंग स्थळ उभारण्यात येणार आहे. एसटी व अतिमहत्त्वाच्या व्यक्‍ती यांच्या व्यतिरिक्‍त कोणतेही वाहन पायथ्यापर्यंत नेण्यात येणार नाही.

देवरूख - यावर्षी श्री क्षेत्र मार्लेश्‍वर यात्रोत्सवासाठी देवस्थानापासून २ किमी अंतरावर खासगी वाहनांसाठी पार्किंग स्थळ उभारण्यात येणार आहे. एसटी व अतिमहत्त्वाच्या व्यक्‍ती यांच्या व्यतिरिक्‍त कोणतेही वाहन पायथ्यापर्यंत नेण्यात येणार नाही. पार्किंग ते पायथा अशी शटल बससेवा ठेवण्यात येणार असून, उत्सवानिमित्त १२ तारखेपासूनच देवरूख आगारातून जादा बसफेऱ्यांचे नियोजन सुरू केले आहे. 

१४ जानेवारी हा उत्सवाचा महत्त्वाचा दिवस असून, १७ तारखेपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. श्री मार्लेश्‍वरचा वार्षिकोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पाडावा यासाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे.

१७ किमीची रस्त्याची डागडुजी होणार
यात्रोत्सवाच्या आधीच देवरूख ते मार्लेश्‍वर या १७ किमी मार्गाची डागडुजी करून खड्डे भरणे, धोकादायक ठिकाणी फलक लावणे, बाजूपट्टी व्यवस्थित करणे, अशी कामे बांधकाम विभागाने पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील बैठकीत सर्व विभागांनी आपापले सुयोग्य नियोजन सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

६ जानेवारीला देवरुखात विभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. यापूर्वीची पहिली बैठक नुकतीच तहसीलदार संदीप कदम यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्यासह महावितरण, एसटी, बांधकाम, आरोग्य विभागांचे अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच, देवस्थान ट्रस्टी उपस्थित होते. 

बैठकीत उत्सवासंदर्भात मार्गदर्शन करून आवश्‍यक सेवा-सुविधांची माहिती घेतली. उपस्थित सर्व विभागांना त्यांच्यावरील जबाबदारीची माहिती देण्यात आली. यानुसार योग्य ते नियोजन करून ६ जानेवारीला अंतिम आढावा बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. देवरूखचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी यापूर्वीच यात्रोत्सवाच्या तयारीत लक्ष घातले आहे.

 

Web Title: Ratnagiri News ST facility Marleshwar Yatra