मल्लखांबच्या प्रोत्साहनातून चिपळूणचा गौरव - भास्कर जाधव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

चिपळूण - "मल्लखांबसारख्या देशी खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम चिपळूण पालिकेने केले आहे. चिपळूणसाठी ही गौरवशाली बाब आहे. ही स्पर्धा शहरातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहील'', असे उद्‌गार आमदार भास्कर जाधव यांनी उद्‌घाटन करताना काढले.

चिपळूण - "मल्लखांबसारख्या देशी खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम चिपळूण पालिकेने केले आहे. चिपळूणसाठी ही गौरवशाली बाब आहे. ही स्पर्धा शहरातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहील'', असे उद्‌गार आमदार भास्कर जाधव यांनी उद्‌घाटन करताना काढले.

शहरातील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात 37 व्या राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक मल्लखांब स्पर्धेला आजपासून सुरवात झाली. श्री. जाधव म्हणाले की, इंग्रज भारत सोडून गेले, परंतु क्रिकेटचा प्रभाव भारतात वाढला. त्यामुळे देशी खेळ लोप पावत आहेत. चिपळूणने मल्लखांबसारख्या खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यात पाग व्यायामशाळेची भूमिका महत्त्वाची आहे. यापूर्वी दोनवेळा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा चिपळुणात झाली.

तिसऱ्या स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा मान मला मिळाला. या स्पर्धेसाठी नंदूरबारपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागातील खेळाडू चिपळूणला आले आहेत. मी क्रीडा राज्यमंत्री असताना भारतातील देशी खेळांना चालना देण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे, तर बक्षिसांची रक्कम महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी समान असावी यासाठीही प्रयत्न केले होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, बांधकाम सभापती आशीष खातू, पाग व्यायामशाळेचे सचिव सुधाकर भागवत यांनीही मार्गदर्शन केले. विश्‍व मल्लखांब संघटनेचे सचिव उदय देशपांडे, छत्रपती पुरस्कार विजेते वामन जोशी, भारतीय मल्लखांब संघटनेचे कोषाध्यक्ष दिलीप गवाणे, सचिव एन. व्ही. कुऱ्हाडे, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र अधिकारी, मंगेश ऊर्फ बाबू तांबे उपस्थित होते.

नगराध्यक्षांवर स्तुतीसुमने
नगराध्यक्षा सौ. खेराडे यांच्या कामात शहर विकासाची तळमळ दिसते. शहरातील मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेत सुरू असलेली अनेक वर्षाची चुकीची परंपरा मोडीत काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. शहरवासीयांनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.

Web Title: Ratnagiri News State level MalKhabha Competition in Chiplun