हर्णैचा निसर्ग उतरला कागदावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

स्पर्धेत सहभागी चित्रकारांनी निसर्गाला कागदावर उतरवले. मूलभूत अभ्यासक्रम एलिमेंटरी, एटीडी विभागामध्ये मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या अमोल तांबेने, तर इंटरमिजिएट ॲडव्हान्स डिप्लोमा विभागामध्ये ठाण्याच्या अक्षय लुष्टेने प्रथम क्रमांक पटकविला. चित्रकारांच्या कुंचल्यातून एकापेक्षा एक भन्नाट चित्र साकारली आहेत. 

सावर्डे - दापोली तालुक्‍यातील हर्णैवर निसर्गाने केलेली मुक्तउधळण टिपण्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट चित्र- शिल्प कला महाविद्यालयाने राज्यस्तरीय प्रत्यक्ष स्पर्धा घेतली. स्पर्धेत सहभागी चित्रकारांनी निसर्गाला कागदावर उतरवले. मूलभूत अभ्यासक्रम एलिमेंटरी, एटीडी विभागामध्ये मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या अमोल तांबेने, तर इंटरमिजिएट ॲडव्हान्स डिप्लोमा विभागामध्ये ठाण्याच्या अक्षय लुष्टेने प्रथम क्रमांक पटकविला. चित्रकारांच्या कुंचल्यातून एकापेक्षा एक भन्नाट चित्र साकारली आहेत. 

दापोली अर्बन बॅंक आणि सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्‌घाटन रवी मेहेंदळे यांनी केले. ठाणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी, रायगड जिल्ह्यातील ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

हर्णै परिसरातील विविध ठिकाणे विद्यार्थ्यांनी निवडली होती. त्यामुळे संपूर्ण हर्णैचे रेखाटन चित्रकारांनी कागदावर उतरले. सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे परीक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्ट प्रा. नितीन केणी, चित्रकीर्तनकार विजयराव बोधनकर यांनी केले. त्याचदिवशी हर्णै येथे बक्षीस वितरण झाले. दापोली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, उपाध्यक्ष शेट्ये, सांगलीचे प्रसिद्ध चित्रकार जे. जी. पैलवान, सूर्यकांत होळकर, प्रा. निबांळकर, शिवाजी म्हस्के, सिकंदर मुल्ला, सपंत नायकवडी आदी 
उपस्थित होते. 

स्पर्धेमध्ये एलिमेंटरी, एटीडी विभागामध्ये द्वितीय क्रमांक ओंकार खातिमकर, तृत्तीय- ओंकार जंगम (दोघेही जे.जे. मुंबई), मयुरेश खळे, शुभम रुके (दोघेही सह्याद्री सावर्डे), इंटरमिजिएट विभागामध्ये अक्षय शिंदे (जे. जे. मुंबई), प्रथमेश गावकर (सह्याद्री सावर्डे) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले. प्रथमेश लोके (डोंबवली), शुभम तरकिरे, प्रियंका मोडकर (दोघेही सह्याद्री सावर्डे) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.

विजेत्यांना अनुक्रमे अडीच हजार, दीड हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेची तयारी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट चेअरमन प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव, प्रा. अमित सुर्वे, रुपेश सुर्वे, प्रदीपकुमार देडगे, अवधूत खातू यांनी मेहनत घेतली. विजेत्यांचे सह्याद्रीच्या अध्यक्षा अनुराधा निकम, कार्याध्यक्ष शेखर निकम, सचिव अशोक विचारे यांनी अभिनंदन केले.

Web Title: Ratnagiri News state level nature drawing competition