दापोलीत उभारणार छत्रपती शिवरायांचा पुतळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

दाभोळ - गेली २५ वर्षे विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत दापोली शहरात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करू, असे आश्‍वासन देणाऱ्या शिवसेनेकडून आता हा पुतळा उभारण्याचा ठराव दापोली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

दाभोळ - गेली २५ वर्षे विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत दापोली शहरात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करू, असे आश्‍वासन देणाऱ्या शिवसेनेकडून आता हा पुतळा उभारण्याचा ठराव दापोली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

दापोली विधानसभेचे शिवसेनेचे तत्कालीन आमदार सूर्यकांत दळवी यांनी लढविलेल्या विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीवेळी शहरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करू, असे आश्‍वासन देऊन मते मिळविली होती. मात्र त्यांच्या आमदारकीच्या २५ वर्षांच्या कालावधीत हा पुतळा काही उभा राहू शकला नाही. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने आपल्या वचननाम्यात हे आश्‍वासन पुन्हा दिले होते.

या आश्वासनपूर्तीसाठी प्रथम दापोली शहरातील केळसकर नाका परिसरात शिवस्मारक व छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात यावा, यासाठी दापोली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे. दापोलीकरांना दिलेले आश्‍वासन लवकरच पूर्ण करू, अशी माहिती युवासेनेचे योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.   

शहरातील सर्व्हे नं. ४५१ येथील पाच गुंठे जागेमध्ये श्री शिवछत्रपती महाराजांचा पुतळा उभारणार जाणार आहे. या जागेजवळील इतर पाच गुंठे शासकीय जागा मागणीसाठीचा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे. ही मंजूरी मिळाल्यावर व महसुल विभागाकडून नगरपंचायतीकडे जागा हस्तांतरित झाल्यावर या स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू होईल, असे कदम यांनी सांगितले.

नगरपंचायतीने या स्मारकासाठी निवडलेल्या जागेची नुकतीच योगेश कदम, नगराध्यक्षा उल्का जाधव, उपनगराध्यक्ष रजिया रखांगे, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी पाहणी केली.

Web Title: Ratnagiri News Statue of Shivaji Maharaj