खेर्डी-चिंचघरी शाळेचे दप्तरमुक्तीचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खेर्डी, चिंचघरी (सती) येथील प्राथमिक विद्यालयाने दप्तरमुक्त वर्गाची सुरुवात केली. आगामी काळात लोकसहभागातून सर्व शाळाच दप्तरमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चिपळूण - विद्यार्थ्याचे वय आणि वजनाच्या तुलनेत त्यांच्या पाठीवर शाळेचे दप्तरच मोठे झाले आहे. दप्तराचे ओझे कमी करण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व शाळांना यापूर्वीच दिल्या होत्या. त्यानुसार सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खेर्डी, चिंचघरी (सती) येथील प्राथमिक विद्यालयाने दप्तरमुक्त वर्गाची सुरुवात केली. आगामी काळात लोकसहभागातून सर्व शाळाच दप्तरमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्राथमिक विद्यालयाचा रौप्यमहोत्सव २०१८-१९ मध्ये साजरा केला जाणार आहे. या वर्षात दप्तरमुक्त शाळा करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांनी 
दप्तरमुक्त शाळेची  संकल्पना मांडली. त्यास शिक्षक-पालक संघ व माता-पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

दप्तरमुक्तीसाठी शाळेतच लाॅकरची सुविधा

दप्तरमुक्त वर्गासाठी पहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांना लॉकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शाळेची पुस्तके ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना जागाही निश्‍चित करून दिली आहे. वर्गातच शाळेचे सर्व दप्तर ठेवले जाईल. घरात अभ्यास करण्यासाठी आवश्‍यक तेवढीच पुस्तके नेता येतील. लॉकर उभारणीसाठी माता पालक संघ, शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

आगामी काळात याच पद्धतीने सर्व वर्गात लॉकर्स सुविधा उपलब्ध करून देत संपूर्ण शाळा दप्तरमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शाळेचे बहुतांशी दप्तर शाळेतच राहिल्याने त्यांच्या पाठीवरील ओझे कमी होण्यास मदत झाली.

पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. नम्रता हळबे, सदस्या सौ. भाग्यश्री गावडे, सौ. शालिनी सकपाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दप्तरमुक्त वर्गाचे नुकतेच उद्‌घाटन झाले.

मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांनी प्रास्ताविकात दप्तरमुक्त वर्गाची माहिती दिली. शिक्षिका सौ. मनीषा कांबळी यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. अपूर्वा शिंदे यांनी सूत्रसंचालन तर सौ. विनया नटे यांनी आभार मानले.

Web Title: Ratnagiri News step of no school bag in Kherde Chichghari