शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी रत्‍नागिरीत विद्यार्थी वेठीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

रत्नागिरी - शहरातील एका खासगी हॉटेलच्या मैदानावर शिवसेनेनेकडून ‘टॉप स्कोअरर्स्‌’ या कार्यक्रमासाठी विविध शाळांमधील मुलांनी सक्‍तीने उपस्थित राहावे, असे तोंडी आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून काढण्यात आले होते.

रत्नागिरी - शहरातील एका खासगी हॉटेलच्या मैदानावर शिवसेनेनेकडून ‘टॉप स्कोअरर्स्‌’ या कार्यक्रमासाठी विविध शाळांमधील मुलांनी सक्‍तीने उपस्थित राहावे, असे तोंडी आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून काढण्यात आले होते.

कार्यक्रमाला आलेल्या हजारो मुलांना दिवसभर ताटकळत राहावे लागले. याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे यांनी येथे दिली.

श्री. शेवडे यांनी मांडलेली भूमिका अशी - बुधवारी (ता. ९) सकाळी दहाच्या सुमारास शिवसेनेकडून टॉप स्कोअरर्स हा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार होते. प्रत्येक शाळेतून तीनशे विद्यार्थी उपस्थित राहावेत, अशी सूचना करण्यात आली होती. तसे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांना देण्यात आले. नेत्यांच्या कार्यक्रमाला गर्दी दाखवून देण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता. प्रत्यक्षात शिवसेनेचे नेतेच उपस्थित राहिले नाहीत. मुलांना उन्हामध्ये ताटकळत उभे राहावे लागले.

सत्तेचा दुरुपयोग करून अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा उपयोग करणे चुकीचे आहे. दुपारी दोनपर्यंत विद्यार्थी मैदानावरच होते. त्यांच्या शिक्षणाचा आणि शाळेतील हजेरीचे काय, याबाबत शिक्षकच संभ्रमात आहेत. अधिकाऱ्यांचे आदेश असल्यामुळे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना त्या कार्यक्रमाला उपस्थित ठेवले होते. तेथे टॅबचे वाटप करण्यात येणार होते, असे समजते. अधिकारी किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही अशाप्रकारे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे होती; परंतु त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. त्यामुळे याविरोधात शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन देणार असल्याचे श्री. शेवडे यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Students for Shivsena Program issue