डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रत्नागिरीची मोहर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

रत्नागिरी - वैद्यकीय कचरा, पॅथॉलॉजी लॅबमधील रक्त, टाकाऊ मासळी आणि कातळशिल्पे, खारफुटी व पर्यटन विकास अशा विविध विषयांवर कृती संशोधन प्रकल्प करून रत्नागिरीच्या बालवैज्ञानिकांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत यश मिळवले. डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी मार्गदर्शन केले.

रत्नागिरी - वैद्यकीय कचरा, पॅथॉलॉजी लॅबमधील रक्त, टाकाऊ मासळी आणि कातळशिल्पे, खारफुटी व पर्यटन विकास अशा विविध विषयांवर कृती संशोधन प्रकल्प करून रत्नागिरीच्या बालवैज्ञानिकांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत यश मिळवले. डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी मार्गदर्शन केले.

सहावीसाठी सर्व काही जाते कुठे, नववीसाठी शाश्वत पर्यटन हे विषय कृती संशोधनासाठी दिले होते. सहावी इयत्तेतील केयूर निरंजन कुलकर्णी (फाटक हायस्कूल) याने सुवर्ण, तर निधी अतुल बडे (शिर्के प्रशाला), अमित पराग फडके (पटवर्धन हायस्कूल), ऋतुपर्ण संतोष स्वामी (एस. पी. एम. इंग्लिश मीडियम स्कूल) यांनी रौप्यपदके प्राप्त केली. नवव्या इयत्तेसाठी रत्नागिरीच्या पटवर्धन प्रशालेतील सोहम प्रसन्न जोगळेकर व वर्धमान शशिकांत पाटणकर यांनी रौप्यपदके पटकाविली.

केयूरने वैद्यकीय आस्थापनांमधील जैव वैद्यकीय कचरा, त्याचे व्यवस्थापन याचा अभ्यास केला. या कचऱ्याचा चिपळूण येथील जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया कारखान्यापर्यंतचा प्रवास आणि त्याचा होणारा शेवट अभ्यासला. शेवटी उरणाऱ्या कार्बनचा परिणामकारक उपयोग त्याने सुचविला आहे.

निधीने मत्स्य प्रक्रिया कारखान्यातील घन आणि द्रव कचऱ्याचा अभ्यास केला. या कचऱ्यापासून पर्ल इसेन्ससारखे मूल्यवर्धित उपपदार्थ तयार करता येतील आणि पूर्ण प्रक्रिया करून शून्य कचरा संकल्पना राबवता येईल, याचा विचार मांडला.
अमितने मिरकरवाडा बंदरात येणाऱ्या खाण्यास अयोग्य ठरणाऱ्या मासळीचा आणि त्यामुळे निर्माण होणारा कचरा आणि त्यावरील विघटन प्रक्रिया अभ्यासल्या. विविध कारणांमुळे खाण्यास अयोग्य ठरणारी ही मासळी प्रथिने आणि ओमेगा ३ सारख्या स्निग्धाम्लांसाठी कशी वापरता येईल, याचा त्याने अभ्यास केला आहे.

ऋतुपर्णने पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्यांसाठी दिले जाणारे रक्त व जैव कचरा ठरलेल्या रक्ताचे पुढे काय होते याचा अभ्यास केला. रक्ताची विल्हेवाट कशी लावतात, निकष अभ्यासले. पॅथॉलॉजी लॅब्सच्या सांडपाण्याचा आणि आसपासच्या मातीच्या नमुन्यांचा अभ्यास केला. 

रक्ताची योग्य विल्हेवाट न लावल्याने काही जिवंत जीवाणूंमुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो, हे 
प्रकल्पात मांडले. सोहमने कर्ला, भाट्ये, शिरगाव आणि साखरतर येथील खारफुटी, जैवविविधता, लोकजीवन, साधन सुविधा, पर्यटन विकास करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आणि रोजगाराच्या संधीतून शाश्वत पर्यटन विकास अभ्यासला.

खारफुटी नर्सरी, जैवविविधता संग्रहालय, येथील वनस्पतींपासून औषधे आणि त्यांवर आधारित स्पा या योजनाही त्याने मांडल्या.
वर्धमानने ऐतिहासिक ठेवा असलेल्या कातळशिल्पांचा अभ्यास केला. या माध्यमातून पर्यटन विकास घडवणे शक्‍य असून त्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायती, इतिहास संशोधक आणि पुरातत्त्व विभाग, पर्यटकांना सामील करून घेतले पाहिजे. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रक्षेत्रावर जाऊन, ग्रामस्थ आणि तज्ज्ञ व्यक्तींना भेटून, प्रयोग करून निष्कर्ष आणि उपाययोजना मांडल्या.

शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी या विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यापासून मार्गदर्शन केले.

Web Title: Ratnagiri News success in Dr Homi Bhabha competition