शिवसेनेचे मंत्रीच अधिसूचना काढून स्वार्थासाठी रद्द करतात - तटकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

चार वर्षांमध्ये कोकणच्या विकासाचा एकही प्रकल्प आणलेला नाही. त्यामुळे निवडणुकांमध्ये जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी केली. 

रत्नागिरी - नाणार (ता. राजापूर) येथील ग्रीन रिफायनरीबाबतची शिवसेनेची भूमिका संभ्रमात टाकणारी व धरसोडीची आहे. सेनेचेच मंत्री अधिसूचना काढतात आणि विरोध झाल्यानंतर स्वार्थासाठी रद्द करण्याची घोषणा करतात. चार वर्षांमध्ये कोकणच्या विकासाचा एकही प्रकल्प आणलेला नाही. त्यामुळे निवडणुकांमध्ये जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी केली. 

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर तटकरे म्हणाले की, राज्यात शिवसेना-भाजप सत्तेत एकत्र आहे. नाणार प्रकल्पावरून त्यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. प्रकल्पाची अधिसूचना मंत्री सुभाष देसाई, रामदास कदम यांनी संयुक्तरीत्या काढली. त्यावेळी त्यांचा प्रकल्पाला पाठिंबा होता. स्थानिकांच्या विरोधानंतर शिवसेनेने भूमिका बदलली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी देसाई यांनी अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली. 

राणे पाठिंबा जाहीर करतील 
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस, शेकाप, मनसे या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सिंधुदुर्गमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व आहे. माजी खासदार नीलेश राणे यांच्याशी चर्चा झाली आहे. पाठिंबा देण्याचा निर्णय नारायण राणेच जाहीर करतील, असे तटकरे म्हणाले.

Web Title: Ratnagiri News Sunil Tatakare comment