आगामी निवडणुका समविचारी पक्षांसोबत - सुनील तटकरे

आगामी निवडणुका समविचारी पक्षांसोबत - सुनील तटकरे

खेड - लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आम्ही समविचारी पक्षासोबत लढवू, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. ते आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने खेड येथे बोलत होते.

आगामी निवडणुका राष्ट्रीय काँग्रेससोबत लढवायच्या की नाहीत, याचे सर्वस्वी अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आहेत; परंतु सद्य:स्थितीत राज्य सरकारचे दिशाहीन धोरण व सत्तेतील भाजप-सेनेची सुरू असलेली रस्सीखेच पाहता महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही बहुधा समविचारी पक्षांसोबत निवडणुकांना सामोरे जाऊ, असे त्यांनी सांगितले. 

आक्रोश मोर्चा ही विधानसभेची तयारी तर नाही ना, या प्रश्‍नांवर उत्तर देताना तटकरे म्हणाले की, ‘‘राज्य सरकारचे गेल्या तीन वर्षांत सुरू असलेले कामकाज, त्यांच्याकरवी चाललेली शेतकऱ्यांची व सर्वसामान्य माणसाची फसवणूक याचा निषेध नोंदविण्यासाठी या आक्रोश मोर्चांची राज्यभरात सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या मोर्चांच्या माध्यमातून राजकारण सुरू असल्याची सोशल मीडियावरील चर्चा चुकीची आहे. आम्हाला राजकारण करायचे आहे. ते आम्ही निवडणुकीवेळी करू. हा सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठीचा आक्रोश मोर्चा आहे. 

‘सेल्फी विथ खड्डा’ या सोशल मीडियावरून सुरू असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नव्या फंड्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी असे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे सोशल मीडियावरून राष्ट्रवादी राजकारण साधत आहे का ? विचारता तटकरे म्हणाले की, ‘‘ सुप्रियाताईंच्या प्रेरणेने तरुण कार्यकर्ते राज्य सरकाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सुटणे आवश्‍यक आहे.’’
 यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे, आमदार भास्कर जाधव, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com