मानसिक स्वास्थ्याठी शिक्षकांचे प्रशिक्षण

मकरंद पटवर्धन
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते, मात्र अलीकडे ताणतणाव, दिल्या जाणाऱ्या शिक्षा या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांनाच विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. ही गरज ओळखून येथील सेवानिवृत्त प्राध्यापक व मानसोपचार तज्ज्ञ माणिक बाबर यांनी कोकणात प्रथमच माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू केले आहे.

समाजाचे प्रतिबिंब शिक्षण व्यवस्थेत पाहावयास मिळते. वर्गातील मानसिक स्वास्थ्याचा मुलांच्या जडणघडणीवर निर्विवाद प्रभाव पडत असतो. मानसिक स्वास्थ्य संशोधनानुसार प्रत्येक १० शिक्षकांमागे ८ जणांना मानसिक समस्या जाणवतात. शिक्षकी पेशा जगभरात सर्वाधिक मानसिक तणावग्रस्त आहे. कॅलिफोर्नियात २० जणांच्या वर्गात तीन विद्यार्थ्यांना मानसिक समस्या असते. ही स्थिती भारतातही आहे, असे प्रा. बाबर यांनी सांगितले.

बीएडच्या शिक्षणात बालमानसशास्त्र शिक्षण फारसे उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात उभे करणे, ओणवे ठेवणे आणि काही वेळा मारण्याचे प्रकारही घडतात. काही शिक्षांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते व त्याच्या बातम्याही प्रसिद्ध होतात. मात्र विद्यार्थी असे का वागतो, त्याचे काय म्हणणे आहे हेसुद्धा शिक्षकांनी समजून घेतले पाहिजे. म्हणूनच शिक्षकांना मानसिकता बदलण्याचे प्रशिक्षण द्यावे, अशी कल्पना सुचल्याचे प्रा. बाबर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांकडे दुर्लक्षामुळे अत्याचार, गुन्हे अशा सामाजिक समस्या निर्माण होतात. हे रोखण्यासाठी वर्गातले मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. दरवर्षी किमान २०० जणांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या वर्गात ५० जणांना जयगड येथे प्रशिक्षण देण्यात आले. १ तासांची ९ सत्रे, मानसशास्त्रीय चाचण्या व विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी घ्यावयाची प्रश्‍नावली व संवाद सत्रे झाली. प्रा. बाबर यांच्यासमवेत प्रा. माधव पालकर, प्रा. सुशील वाघधरे व प्रा. चंद्रमोहन देसाई यांनी यात मार्गदर्शन केले. शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनीही या कार्यक्रमास परवानगी दिली आहे.

Web Title: Ratnagiri News Teacher training for mental health